आयआयटीच्या टेकफेस्टची सांगता
आयआयटी मुंबईत भरलेल्या टेकफेस्टमधील रोबोवॉर स्पध्रेत यंदा भिवंडीतील युनिव्हर्सल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘लीग ऑफ लेजेंड’ या रोबोने बाजी मारली. ही स्पर्धा कोण जिंकणार याविषयी तंत्रप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असते.
कॅड या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनवलेल्या या रोबोने ड्रमर या गेली तीन वष्रे रोबोयुद्धात वर्चस्व असलेल्या रोबोला हरवत आपले कौशल्य दाखवले. रोबोयुद्धाच्या निकालानंतर लीग ऑफ लेजेंड गटाच्या कौशल भुवा या विद्यार्थ्यांने सांगितले की, ‘‘या स्पध्रेसाठी आम्ही गेली सहा महिने तयारी करत होतो. चांगली साधने नसतानाही केवळ वेळेचे व्यवस्थापन व कार्यक्षमतेच्या जोरावर आमच्या रोबोला यश मिळाले आहे. यंदा पहिल्यांदाच आम्ही स्पध्रेत सहभागी झालो होतो, पण आमच्या यशाने रोबोयुद्धात नवा पायंडा पडणार आहे.’’
देशभरातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला आय.आय.टी.च्या टेकफेस्ट या महोत्सवाची सांगता सोमवारी झाली. टेकफेस्टच्या शेवटच्या दिवशीही विविध स्पर्धा, व्याख्याने व कार्यक्रमांची रेलचेल होती. ओझोन या कार्यक्रमातून विविध तंत्रज्ञ, कलाकार, विद्यार्थ्यांनी आपल्या तंत्र व कलाकौशल्यांनी आलेल्यांचे लक्ष वेधून घेतले. यात बायसिकल स्टंट शो या सायकलवर चित्तथरारक स्टंट करून दाखवणाऱ्या प्रात्यक्षिकांना मोठी गर्दी झाली होती. याशिवाय युनिसायकल या प्रदर्शनात निरनिराळ्या आकाराच्या सायकलीही पाहायला मिळत होत्या. तसेच तोंडाने विविध प्रकारच्या वाद्यांचा आवाज काढणारा कलाकार, टॅटू गोंदवणारा कलाकार हेही अनेकांचे आकर्षण ठरले.
बक्षिसाच्या रकमेवरून नाराजीचा सूर
टेकफेस्टमध्ये ‘इंटरनॅशनल रोबोटिक चॅलेंज’ या स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांच्या रकमेबाबत स्पध्रेतील विजेत्यांचा आयोजकांबरोबर वाद निर्माण झाला आहे. या स्पध्रेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या सिलोन जर्मन टेक्निकल ट्रेिनग इन्स्टिटय़ूटच्या गटाला प्रथम क्रमांक मिळाला असून बांगलादेशच्या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक तर श्रीलंकेच्याच मोराटुवा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. परंतु टेकफेस्टच्या संकेतस्थळावर पारितोषिकांच्या रकमेविषयी दिलेल्या माहितीनुसार पारितोषिके देण्यात आली नसल्याचे या विजेत्यांचे म्हणणे आहे. स्पध्रेसाठी अंतिम फेरीतील तीनही विजेत्यांना मिळून सुमारे साडेचार लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. परंतु निकालानंतर प्रथम विजेत्यास ५० हजार तर द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ३० व २० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे विजेते आणि आयोजक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या गेलेल्या या स्पध्रेच्या अंतिम फेरीसाठी बांगलादेश, इजिप्त व श्रीलंकेचे तीन गट अशा एकूण पाच गटांची निवड झाली होती. श्रीलंकेच्या दोन गटांचा प्रयोग साधने व प्रवासाचा खर्च प्रत्येकी सुमारे दीड ते दोन लाख रुपये झाला आहे. स्पध्रेत सहभागी झालेल्या विदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या दूतावासाकडून प्रवास व राहण्याचा खर्च दिला जातो, परंतु यातील काही संघांचा खर्च दूतावासाकडून केला गेलेला नाही. त्यामुळे जाहीर केलेल्या रकमेतील उरलेली रक्कम इतर स्पर्धकांच्या प्रवास व राहण्याच्या खर्चासाठी देण्यात येणार आहे, असे आयोजकांकडून यश मेहता यांनी सांगितले.

रोबोयुद्ध स्पध्रेत बेटिंग
टेकफेस्टमध्ये पहिल्यांदाच रोबोयुद्ध स्पध्रेत प्रेक्षकांना बेटिंग करता येत होती. यासाठी रोबोवॉर नावाचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले होते. अ‍ॅपच्या माध्यमातून बेटिंगमध्ये जिंकणाऱ्या प्रेक्षकांना मिळालेल्या गुणांकानुसार, आयोजकांकडून कूपन देण्यात येत होते. या कूपनचा उपयोग संकुलातील दुकानांत खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी केला जात होता.