पियूषा जगताप
(गुणवत्ता यादीत ७६२ वी)
पियूषा मूळची अहमदनगरची आहे. पुण्यातील शेतकी महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यावर तिने ज्ञानप्रबोधिनी अभ्यास केंद्रातून केंद्रीय लोकसेवा परीक्षांसाठी तयारी सुरू केली. हा तिचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे आणि अभ्यास उशिरा सुरू केल्यामुळे गुणवत्ता यादीत नाव येणार हे माहीत होते, पण ७६२ वी रँक मिळेल असे वाटले नव्हते, असे तिने सांगितले. लोकप्रशासन आणि शेती हे तिचे वैकल्पिक विषय होते. गेले दीड वर्षे दररोज दहा तास तरी अभ्यास झालाच पाहिजे, असे पियूषाने ठरवले होते. यापुढेही गुणानुक्रम उंचावण्यासाठी लोकसेवा आयोगाची परीक्षा ती देणार आहे. पहिल्या प्रयत्नात अभ्यास उशिरा सुरू केला होता, पण आता दुसरा प्रयत्न मात्र पूर्ण तयारीने देणार असल्याचे ती म्हणाली.

अभिजित राऊत
(गुणवत्ता यादीत ११३ वा)
अभिजित मूळचा अकोल्याचा असून त्याने परीक्षेची तयारी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी अभ्यास केंद्रातून केली, तर प्रवीण चव्हाण यांच्याकडे त्याने मुलाखतीसाठीचे मार्गदर्शन घेतले. भूगोल आणि लोकप्रशासन हे त्याचे वैकल्पिक विषय होते. हा अभिजीतचा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात खूप अभ्यास करूनही त्यात अभिजीतचा गुणवत्ता क्रमांक पंचवीस गुणांनी हुकला होता. आपली बलस्थाने आणखी प्रबळ करणे आणि आपण जिथे कमी पडतो तिथेही या बलस्थानांचा खुबीने वापर करणे, हे धोरण परीक्षेसाठी वापरल्याचे तो म्हणाला. परीक्षा जवळ आल्यावर अभिजीत दिवसाला साधारणपणे बारा तास अभ्यास करत होता. रूरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) तो जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. ‘क्वांटिटि’ पेक्षा ‘क्वालिटी’ च महत्त्वाची, असे तो आवर्जून सांगतो.

रवी पट्टनशेट्टी
(गुणवत्ता यादीत ४७ वा)
रवीचा जन्म बेळगावचा. पण तो जन्मापासून पुण्यातच राहतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा हा रवीचा तिसरा प्रयत्न आहे. त्याचे वैकल्पिक विषय मानववंशशास्त्र व मानसशास्त्र हे होते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून तो बंगळुरूला ‘इंडियन कॉर्पोरेट लॉ’ खात्यात नोकरी करत आहे. कार्यालयातून घरी गेल्यावर संध्याकाळी अभ्यासासाठी वेळ काढत असल्याचे तसेच परीक्षेआधी काही दिवसांची रजा घेऊन अभ्यास करत असल्याचे त्याने सांगितले. नोकरी सांभाळून दिलेला दुसरा प्रयत्न सपशेल हुकल्याने तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी ताण आणखी वाढला होता, असे तो म्हणाला.

नेहा देशपांडे
(गुणवत्ता यादीत २०४ वी)
नेहाचा हा चौथा प्रयत्न होता. ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन’ मधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेली नेहा पूर्णवेळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत होती. इतिहास आणि राज्यशास्त्र हे तिचे वैकल्पिक विषय होते. प्रवीण चव्हाण, अतुल लांडे आणि तुकाराम जाधव यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. परीक्षांसाठी तिने दररोज दहा ते बारा तास अभ्यास केला. परीक्षा दिल्यानंतर ती लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी अध्यापनही करत होती.     

क्षिप्रा आग्रे
(गुणवत्ता यादीमध्ये २९ वी)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये (यूपीएससी) मिळालेल्या यशाचा आनंद आहे, पण अविनाश धर्माधिकारी सर म्हणतात त्यानुसार ही फक्त सुरुवात आहे याची जाणीव निश्चित आहे, अशी भावना क्षिप्रा आग्रे हिने व्यक्त केली. क्षिप्राचा हा तिसरा प्रयत्न आहे. क्षिप्रा ही मूळची लातूरची असून सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहे. तिची आई शोभा आग्रे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेमध्ये नोकरीस असून वडील सूर्यकांत आग्रे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. क्षिप्रा हिने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) बी. टेक. (सिव्हिल) केले आहे. यूपीएससी परीक्षेसाठी इतिहास आणि मराठी साहित्य हे तिचे विषय होते. मला चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी आणि प्रवीण चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, असे क्षिप्रा हिने सांगितले.

मृण्मयी जोशी
(गुणवत्ता यादीमध्ये ९८ वी)
केवळ दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. लहान वयामध्ये सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, पण ही सुरुवात आहे याची जाणीव आहे. अजून बरेच काही साध्य करायचे आहे, अशी भावना २२ वर्षांच्या मृण्मयी जोशी हिने व्यक्त केली. मृण्मयीची आई न्यायाधीश असून वडील शशांक जोशी हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. मृण्मयीने फग्र्युसन महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयामध्ये पदवी संपादन केली. या परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि इतिहास हे तिचे विषय होते. मला ज्ञानप्रबोधिनी, युनिक अॅकॅडमी आणि चाणक्य मंडल यांचे मार्गदर्शन लाभले, असे मृण्मयीने सांगितले.

ओंकार मोघे
(गुणवत्ता यादी ६६४ वा)
पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश मिळाल्यामुळे मी खूश आहे, अशी भावना ओंकार मोघे याने व्यक्त केली. मला फॉरेन सव्र्हिसेसमध्ये काम करण्याची इच्छा आहे. पण, त्या सेवेमध्ये काम करण्यासाठी हवे तर आणखी एकदा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्याने सांगितले. ओंकारने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदवी संपादन केली. ओंकारचे वडील पर्वती इस्टेट येथील चितळे फॅक्टरीमध्ये बाकरवडी विभागाचे व्यवस्थापक म्हणून काम करीत असून आई भाग्यश्री मोघे या गृहिणी आहेत. या परीक्षेसाठी इतिहास आणि भूगोल हे विषय घेतलेल्या ओंकारला ज्ञानप्रबोधिनीच्या रवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रुती ओझा
(गुणवत्ता यादीत ८२ वी)
निकाल कळला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मला हे अपेक्षित नव्हते. पण खूप आनंद झाला आहे. मी मुंबईची असले तरी माझे पदव्युत्तर शिक्षण मी २०१२ मध्ये कोलकोता येथील महाविद्यालयातून पूर्ण केले. त्याच वर्षी मी ही परीक्षा दिली होती. आता येत्या सप्टेंबरपासून आमचे दोन वर्षांचे प्रशिक्षण सुरू होईल. हे प्रशिक्षण संपल्यानंतर जिथे मला नेमणूक  दिली जाईल तेथे खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल.

दिव्या अय्यर
(गुणवत्ता यादीत ५१७ वी)
२०११ मध्ये मी ‘सी.ए.’झाले आणि लगेचच म्हणजे २०१२ मध्ये मी ही परीक्षा दिली. त्यामुळे अभ्यासाला तसा कमी वेळ मिळाला. खरे तर माझे ध्येय ‘आयएएस’होते. मिळालेल्या रॅंकमुळे मला आता ते शक्य होणार नाही. पण पहिल्याच प्रयत्नात मी उत्तीर्ण झाले, यात समाधान आणि आनंद आहे. केंद्र आणि राज्य शासनाची विविध संकेतस्थळे पाहण्याचा मला फायदा झाला.   

 विवेक संभार्या
(गुणवत्ता यादीत ९०६)
यशस्वी झाल्याने माझ्या घरी आनंदाचे वातावरण आहे. माझे वडीलही आयपीएस अधिकारी असल्याने लहानपणापासून मीही आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. सिडनेहॅम कॉलेजमधून वाणिज्य शाखेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर येस बॅंके त काम केले. पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा यश मिळाले नाही म्हणून मी पुन्हा एकदा परीक्षा दिली. गुणवत्ता यादीत आलो तरी आयएएसचे ध्येय अजून दूर आहे.