‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत डॉ. मिलिंद पराडकर यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा उहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावानं प्रकाशित झाली होती…

‘दुर्ग’ या संकल्पनेचा जन्म ते अठराव्या शतकापर्यंत या संकल्पनेनं घेतलेली विविध रूपं याची शास्त्रीय मांडणी या ‘दुर्गविधानम्’ लेखमालेच्या सव्वीस भागात करण्यात आली. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही लेखमाला दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी, सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर, विख्यात अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णींच्या हस्ते पुस्तकरूपात प्रकाशित होते आहे.

महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या सहकार्याने व निलचंपा प्रकाशनातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात, विख्यात पुरातत्त्वज्ञ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती व इंडियन कौन्सिल फॉर हिस्टरीकल रिसर्च या भारत सरकारच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद प्रभाकर जामखेडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिवडी येथील दुर्गात होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे भूषविणार आहेत. यावेळी प्रसिद्ध गिर्यारोहक आणि लेखक श्री. वसंत वसंत लिमये ‘दुर्गविधानम्’चे लेखक डॉ. मिलिंद पराडकर यांच्याशी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधणार आहेत.

प्रकाशित झालेला ग्रंथ यावेळी ₹४५०/- या सवलतीच्या दरात रसिक वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.