07 December 2019

News Flash

राष्ट्रीय उद्यानात अखेर वाहनांना बंदी

मार्चअखेरीस वाहनतळ खुले; विजेवर धावणाऱ्या बसचा पर्याय

|| अक्षय मांडवकर

मार्चअखेरीस वाहनतळ खुले; विजेवर धावणाऱ्या बसचा पर्याय

बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या वाहनतळाचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात असून मार्च महिन्याच्या अखेरीस हे वाहनतळ खुले होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आपल्या खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांसह उद्यान परिसरात फिरता येणार नाही.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा पर्याय पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना इलेक्ट्रिकल बसगाडय़ा, सायकल या माध्यमातून उद्यानाची सफर करता येईल. राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित वनक्षेत्रात येणाऱ्या खासगी वाहनांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. शिवाय वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेधडक  गाडय़ा चालविल्याने वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून पर्यावरणप्रेमींकडून उद्यानाबाहेर वाहनतळ निर्माण करून पर्यटकांच्या खासगी वाहनांना उद्यानात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली जात होती. मात्र राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित वनक्षेत्राच्या जागेत वाहनतळ उभारण्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या. उद्यान प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये उद्यानाबाहेरील २.९९ एकर क्षेत्र वाहनतळासाठी राखीव करण्याचे आदेश दिले.

गेल्या वर्षी ३०० वाहने उभी करण्याची क्षमता असलेल्या वाहनतळाच्या निर्मितीली सुरुवात झाली. यासाठी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  (एमटीडीसी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस वाहनतळ उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या वाहनतळाचे काम अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती याप्रकरणी पाठपुरावा करणारे ‘रिव्हर मार्च’चे विक्रम चौगले यांनी दिली.

वाहनतळ  खुले झाल्यानंतर विद्युत बसच्या साहाय्याने उद्यान फिरावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यान प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. या विद्युत बस ‘एमटीडीसी’कडून आणल्या जाणार असून त्यामधून मिळणारा नफा दोन्ही विभाग समान वाटून घेणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. वाहनतळाचे व्यवस्थापन ‘एमटीडीसी’कडून केले जाणार आहे.

मार्चअखेपर्यंत वाहनतळाचे काम पूर्ण होईल. वाहनतळ खुले झाल्यानंतर पर्यटकांच्या खासगी वाहनांना उद्यानात प्रवेशबंदी असेल. पर्यटकांना उद्यान फिरविण्यासाठी एमटीडीसीकडून ११ इलेक्ट्रिकल बसगाडय़ा आणल्या जाणार आहेत.    – अन्वर अहमद, मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

First Published on February 12, 2019 2:35 am

Web Title: vehicle ban in national park
Just Now!
X