अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांची ऑनलाइन तपासणी करण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयोग या शाखेच्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी मोठा मनस्ताप ठरला आहे. कारण उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना विद्यापीठाने घातलेला घोळ निस्तरण्याचा पलीकडचा आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगच न झाल्यामुळे त्यांची तपासणी होऊ शकलेली नाही. केवळ पुरवण्यांचेच मूल्यांकन झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसल्याचे ‘लोकसत्ता’ने २० एप्रिलच्या अंकात दिले होते. पण, गोंधळाची ही मालिका इथेच संपली नाही. कारण, नापास झालेल्या व आपल्या गुणांविषयी समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून काढण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपींवरून यापेक्षाही अधिक गंभीर प्रकारचे घोळ उघड होत आहेत.  
आपल्या उत्तरपत्रिकेत भलत्याच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे कागद घुसवण्यात आल्याचे गंभीर प्रकार नवी मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या बाबतीत घडला. या विद्यार्थिनीला ‘रोबोटिक्स अ‍ॅण्ड आर्टिफिशिअल इंटिलिजन्स’ (सातवे सत्र) या पेपरमध्ये १४ गुण मिळाले होते. म्हणून तिने या पेपरची फोटोकॉपी मागिवली. त्यात आपल्याच वर्गातील एका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे कागद घुसवण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या विद्यार्थिनीला बुधवारी संपूर्ण उत्तरपत्रिका मिळाली.  आपल्या वर्गातील आणखी सहा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले.
अभियांत्रिकीबरोबरच विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या फोटोकॉपीबाबतही विद्यापीठाने घोळ घालून ठेवले आहेत.

गैरहजर, शून्य गुण
अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्यांला परीक्षेला हजर असतानाही गैरहजर दाखवून ‘शून्य’ गुण देण्यात आले होते. म्हणून त्याने फोटोकॉपी मागवून त्याची फेरतपासणी करवून घेतली. त्यात त्याला ३० गुण मिळाले. परंतु, त्यातही त्याच्या तीन प्रश्नांचे मूल्यांकनच झाले नव्हते. केवळ पुरवणीचे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा ‘निकाल’ लावण्याचे प्रकार तर शेकडो आहेत.

निकालाविषयी असमाधानी असलेले जे विद्यार्थी आपली फोटोकॉपी मागवित आहेत, त्यांच्याच बाबतीत हे प्रकार प्रकर्षांने पुढे येत आहेत. पण, ज्यांनी फोटोकॉपी मागविलेली नाही अशा लाखो विद्यार्थ्यांचे काय? अनेक चांगल्या कंपन्या स्पर्धेत असतानाही विद्यापीठाने याच विशिष्ट कंपनीला हे कंत्राट का दिले?
– सुधाकर तांबोळी, अधिसभा सदस्य (मनविसे)