गझधरबंद पाणीउपसा केंद्र पूर्णपणे कार्यान्वित करण्यात अपयश

पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याकरिता गझधरबंद पाणीउपसा (उदंचन) केंद्र यंदाच्या पावसाळ्यातही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे जुहू कोळीवाडा, शास्त्रीनगर, लिंकिंग रोड येथे या पावसाळ्यातही पाणी तुंबण्याची चिन्हे आहेत.

गेली तीन वर्षे या केंद्राचे बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी हे केंद्र डिसेंबरमध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. सध्या या केंद्राचे सहापैकी चार पंप जोडण्यात आले असून दहा जूनला चाचणी घेतल्यानंतर हे केंद्र सुरू केले जाईल. त्यामुळे या पावसाळ्याआधी ते अध्र्या क्षमतेनेच कार्यान्वित राहील.

भरतीच्या वेळी शहरातील सखल भागात तुंबणारे पाणी उपसून समुद्रात टाकण्यासाठी विविध ठिकाणी जलउपसा केंद्र बांधण्याचे पालिकेने ठरवले होते. त्यातील गझधरबंद हे सहावे केंद्र आहे. या केंद्राचे काम जून २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. या केंद्रामुळे जुहू कोळीवाडा, दौलत नगर, शास्त्री नगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, लिंकिंग रोड, नवली आग्रीपाडा शाळा परिसरात दरवर्षी हमखास तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा जलदगतीने होऊ शकेल. १३१ कोटी रुपये खर्चाच्या या केंद्राचे काम पावसाळ्याव्यतिरिक्त १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सद्यस्थितीत या केंद्राचे संपूर्ण काम झालेले नाही. या केंद्रात जलउपशासाठी सहा पंप बसवण्यात येणार आहेत. त्यातील चौथा पंप नुकताच लावण्यात आला. इतर पंप लावण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती विशेष अभियांत्रिकी व प्रकल्प संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी दिली. सध्या चाचण्या सुरू आहेत. मात्र नाल्यांमध्ये पाणीच नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणीउपसा करण्याची चाचणी करण्यासाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे या केंद्राची १० जून रोजी चाचणी करण्याचे ठरवण्यात आले आहे. चार पंप कार्यान्वित झाले तरी या परिसरातील पाणीउपसा होऊ शकेल, असेही व्हटकर यांनी सांगितले.

उदंचन केंद्रांचे काम

भरतीच्या वेळी नाल्यांच्या पातमुखातून समुद्राचे पाणी शहरात घुसण्याचा प्रकार घडतो. अशा वेळी मुसळधार पाऊस पडल्यास सखल भागात पाणी तुंबते. त्यामुळे नाल्याचे मुख बंद करून नाल्यातील पाणी उपसून समुद्रात टाकण्यासाठी आठ ठिकाणी केंद्र उभारण्याची योजना ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली होती. मात्र कागदावरील ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ लागला.