मुंबई : करोनाकाळात अनेक तरुण-तरुणींच्या लग्नाचा मुहूर्त हुकला, तर काहींनी थोडक्यात लग्न उरकले. बेस्टमधील ३० वर्षीय वाहकालाही करोनाची गंभीर लक्षणे असल्याने दोन वेळा लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. करोनातून मुक्त झाल्यानंतर त्याने लग्नासाठी नोव्हेंबर महिन्यातील तारीक पक्की के ली आहे.

गेली १० वर्ष बेस्ट उपक्र मात वाहक म्हणून काम करणारे ३० वर्षीय सचिन जावळे (नाव बदलेले आहे)यांना करोनाची लागण झाली. सर्दी, खोकला, ताप येताच त्यांनी करोनाची चाचणी के ली. करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रथम एका खासगी रुग्णालयात दोन दिवस दाखल झाले. परंतु बेस्टमधील वैद्यकीय अधिकारी व उपक्र माशी चर्चा के ल्यानंतर त्यांना ३० ऑगस्टला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर लक्षणे दिसू लागली व प्रकृती आणखीनच बिघडली. सुरुवातीला ऑक्सिजनवर आणि त्यानंतर सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून उपचाराला सुरुवात केली आणि औषधोपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. अखेर ११ ऑगस्टला सचिन यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यासंदर्भात सचिन यांनी बोलताना सायन रुग्णालयाचा डॉक्टर व बेस्ट उपक्र माचे आभार मानले. टाळेबंदीत कर्तव्यावर असताना करोनाची लागण कशी झाली हेच समजले नसल्याचे ते म्हणाले. करोना व त्यामुळे टाळेबंदी याचा खूपच मनस्ताप सहन करावा लागला. टाळेबंदीमुळे १९ मे रोजी असलेल्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला आणि २९ सप्टेंबरला लग्नाची तारीख निश्चित के ली. परंतु त्याआधी करोना झाला. तब्येत जरी चांगली असली तरीही खबरदारी म्हणून लग्नाचा मुहूर्त पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता ३० नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली असून लग्न सोलापूरला होणार असल्याचे सचिन म्हणाले. करोना व झालेल्या उपचाराची सर्व माहिती होणाऱ्या पत्नी व नातेवाईकांना त्यांनी दिली. सचिन हे मुंबईतील बेस्टच्या चांदिवली येथील वसाहतीत आई-बाबांसोबत राहतात. आई-बाबा गावी राहणारे. लग्नाचा पहिला मुहूर्त ठरण्याआधी आई-वडील कामानिमित्त मुंबईत आले व त्यानंतर ते इथेच राहिले. मुंबईची माहिती नसतानाही जेवणाचा डबा घेऊन बाबा सायन रुग्णालयापर्यंत रिक्षाने येत होते, अशी आठवणही सांगितली.