राजकारणी आत्महत्या का करत नाहीत? असं म्हणत रिचा चढ्ढा या अभिनेत्रीने तिचं रोखठोक मत मांडलं आहे. सेजल शर्मा आणि कुशल पंजाबी या दोन कलाकारांनी आत्महत्या केली. याचसंबंधीचा प्रश्न रिचाला विचारण्यात आला. त्यावेळी तिने राजकारणी आत्महत्या का करत नाहीत? असा प्रश्न विचारला. अनेक राजकारणी भ्रष्टाचार करतात, पैसे खातात. त्याबद्दलच्या बातम्या आपण वाचतो मात्र कोणत्या राजकारण्याने आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असा प्रश्न अभिनेत्री रिचा चढ्ढाने विचारला आहे. एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिचाने हा प्रश्न उपस्थित केला आहे.

एवढंच नाही याच मुलाखतीत रिचाने सिनेसृष्टी ही क्रूर आहे असंही भाष्य केलं आहे. “अनेकदा अनेक कलाकार हे प्रचंड तणावाखाली असतात. त्यातून ते आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. फक्त अयशस्वी कलाकारच असं करतात असं नाही तर यशस्वी कलाकारही अनेकदा तणावाखाली असतात. काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोणने हे सांगितलं होतं की एक काळ असा होता की ती डिप्रेशनमध्ये होती. अपयशानेच माणूस खचतो असं काही नाही. यशस्वी माणूसही तणावात जाऊ शकतो, डिप्रेस होऊ शकतो. कलाकारांच्या, सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांच्या स्ट्रेसवर, मानसिक तणावांवर चर्चा होत नाही.” असंही मत रिचाने व्यक्त केलं.

एक व्यक्ती म्हणजे देश नाही

एवढंच नाही तर रिचाने राजकारणावरही भाष्य केलं. सरकारने दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत. सरकारबाबत कोणाच्याही मनात राग नाही. मात्र एक व्यक्ती म्हणजे देश नाही. हा देश आपल्या सगळ्यांचा आहे. आपण सगळ्यांनी मिळवून देश घडवला पाहिजे असंही रिचाने म्हटलं आहे. विद्यार्थी हे आपल्या देशाचं भवितव्य आहेत. देश घडवण्यासाठी त्यांचं योगदान मोलाचं आहे असंही रिचाने म्हटलं आहे.