एरवी दुष्काळासह राज्याच्या जवळपास प्रत्येक प्रश्नावर प्रतिक्रिया देणारे केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यावर गप्प का बसून आहेत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. त्याचप्रमाणे ‘एनडीए’ने पंतप्रधानपदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
राज्यात दुष्काळ आहे असेच बहुधा सरकारला वाटत नसावे, एवढे हे सरकार दुष्काळाबाबत संवेदनाहीन आहे. सिंचनाची टेंडर काढून ‘टक्केवारी’ क शी वाढेल याची काळजी घेण्यात मंत्री मग्न असल्याचे ‘मातोश्री’वर माध्यमांशी बोलताना उद्धव म्हणाले. अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार हे गप्प का आहेत ते आपल्याला समजू शकत नाही. मात्र हा प्रश्न केवळ माफी मागून सुटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी दादा, बाबा आणि आबा या शब्दांमागे आपुलकीची भावना होती. आज हे शब्द निष्क्रियतेचे प्रतिक बनले आहेत, असा टोला त्यांनी हाणला.