आम्हाला आव्हान द्यायला जे पुढे येत आहे, त्यांचे आव्हान मोडून तोडून महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवणार, त्यासाठी मला शिवसैनिकांची साथ हवी आहे. सत्तेच्या लालसेसाठी मला भगवा फडकावयचा नाही. अशी लालसा असलेल्या मुख्यमंत्र्याला मी खुर्चीवर बसूही देणार नाही. लोकांसाठी मला सत्ता हवी आहे, असे उद्गार शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. शिवसेनेच्या ५२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, आम्ही जिंकलो म्हणून कधी माजलो नाही, तसेच हारलो तरी खचलो नाही. उलट अनेक आव्हानांचा सामना आम्ही केला आहे. मात्र, सध्या आम्हाला आव्हान द्यायला जे पुढे येत आहे, त्यांचे आव्हान मोडून तोडून महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवणार अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला शिवसैनिकांची साथ हवी आहे, त्यासाठी मला थेट समोरासमोर रोखठोक समर्थन हवे आहे. मिस्ड कॉलवर सदस्य नोंदणी नको, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पक्ष नोंदणी अभियानावर निशाणा साधला. त्याचबरोबर भाजपाने सुरु केलेल्या संपर्क फॉर समर्थन या मोहिमेवर टीका करताना या मोहिमेविरोधात भाजपा सरकारची खरी कामगिरी उघड करण्यासाठी सत्यशोधन अभियान सुरु करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पगड्यांमधून तुम्ही मराठी माणसामध्ये फुट पाडण्याचे राजकारण करीत आहात, यासाठी मराठी माणूस तुम्हाला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. पगड्यांमुळे लोक प्रसिद्ध झालेले नाहीत तर त्या लोकांमुळे या पगड्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे राजकारण करायचेच असेल तर दैवतांच्या पगड्या वापरू नका.

रमजान महिन्यानिमित्त केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही उलट दहशतवादी कारवायांमध्ये वाढच झाली. यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू तसेच जवानही शहीद झाले. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो तर तुम्ही रमजानच्या वेळीच शस्त्रसंधी का केली. गणेशोत्सवाच्या काळात सरकार कधी शस्त्रसंधी करते का? सरकार धर्माचे राजकारण करीत असून बांगलादेशातील हिंदूंना इशान्येकडील राज्यात घुसवण्याचे बिल सरकार आणणार असल्याचा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.

दरम्यान, काश्मीरमधील पीडीपी सरकारचा पाठिंबा काढण्यावरुनही ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरचे सरकार नालायक असल्याचे तुम्हाला ३ वर्षात कळले नाही का? असा सवाल करीत काश्मीरच्या सरकारचा पाठींबा काढल्याबद्दल अभिनंदन पण आता असेच पुढे जात पाकिस्तानला चिरडून टाका असे आवाहन त्यांनी सरकारला केले.