किरकोळ रकमेचे आमीष दाखवून आसाम, आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी

अंमली पदार्थाची तस्करी विनाअडथळा व्हावी, लाखोंचा साठा पोलिसांनी पकडू नये, साथीदार गजाआड होऊ नयेत यासाठी तस्कर टोळय़ा परिस्थितीनुरूप शक्कल लढवत असतात. महिलांचा जास्तीत जास्त वापर हा त्याचाच एक भाग आहे. दोन दिवसांपुर्वी मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या दोन टोळया अल्पवयीन मुलांकरवी आसाम, आंध्र प्रदेशातून लाखोंचा गांजा मुंबईत आणत आणि विकत होत्या, अशी माहिती पुढे आली आहे.

पथकाच्या कांदिवली शाखेने बुधवारी गीता शेख, तिचा पती मुनीर, मुनीरचा पुतण्या महोम्मद फिरोज अली उर्फ लंगडा आणि जुबेदा शेख अशा चौघांना दुर्गानगर परिसरातून २३ किलो गांजासह अटक केली. गीता, जुबेदा या दोघी मुंबईतील सर्वात मोठया गांजा पुरवठादार आहेत. शहरातील बहुतांश सर्वच छोटे बडे विक्रेते या दोघींकडून गांजा विकत घेतात. त्यामुळे या दोघींची अटक अंमलीपदार्थविरोधी पथकाचे मोठे यश असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या चौघांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुबेदा दहिसरला राहते आणि वांद्रे येथील गॅलेक्सी, गेईटी सिनेमागृहांबाहेर तिकिटे ब्लॅक करते. हा तिचा जोडधंदा आहे. मात्र त्याआधारे ती वांद्रे परिसरातल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गांजा विकते. गेल्या आठेक वर्षांपासून गांजा व अन्य अंमली पदार्थाच्या तस्करीत, विक्रीत सक्रिय आहे. सुरुवातीला तिचा पती व अभिलेखावरील गुन्हेगार मुस्तफासोबत हा अवैध धंदा करत होती. काही वर्षांपूर्वी दोघे विभक्त झाले. त्यानंतर जुबेदा स्वतंत्रपणे गांजा व्यवसायात उतरली.

गीता व जुबेदा आसाम, हैदराबादेतून गांजाचा साठा विकत घेतात. पोलिसांची नजर चुकवून गांजा सहजरित्या मुंबईत आणण्यासाठी या दोघींनी अल्पवयीन मुलांना हाताशी धरल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोघींसाठी अनेक अल्पवयीन मुले गांजा आणण्याचे काम करतात. त्यांना पैसे, कपडय़ांचे आमीष दाखवले जाते. ट्रेन किंवा बसमधून प्रवास करताना अल्पवयीन मुलांवर सजहासहजी सुरक्षा यंत्रणांचा संशय बळावत नाही. झाडझडतीही होत नाही.

दोघींच्या संपर्कात असलेली व त्यांच्यासाइी परराज्यांमधून गांजा आणणाऱ्या बहुतांश मुलांना आपण गांजाची तस्करी करतोय याची कल्पना आहे. पण हा गंभीर गुन्हा आहे, त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते याची कल्पना मात्र त्यांना नाही. यामुळे किरकोळ पैशांच्या आमीषावर ही मुले वेळोवेळी गांजा आणण्याचे काम करतात.

अंमली पदार्थाच्या तस्करीत आणि विक्रीत महिलांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. खासगी वाहनाने उत्तर भारतातून चरस, गांजा, हेरॉईनची तस्करी करताना टोळीत महिला, लहान मुलांचा हटकून समावेश केला जातो.