लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : चेंबूर येथे १२ वर्षांच्या मुलावर चार मुलांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाच्या वडिलांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्स अॅपद्वारे घटनेची चित्रफीत प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वडिलांनी याप्रकरणी चेंबूरमधील आर.सी.एफ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्यात सहभागी चारही आरोपी अल्पवयीन असून त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आणखी वाचा-कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी, मुंबई विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय

तक्रारदारांना २१ एप्रिल रोजी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक चित्रफीत प्राप्त झाली होती. त्यात इमारतीच्या गच्चीवर चार अल्पवयीन मुले तक्रारदारांच्या मुलावर अत्याचार करीत असल्याचे दिसले. ही चित्रफीत पाहून तक्रारदार प्रचंड घाबरले. त्यांनी मुलाला विश्वासात घेतले असता आरोपींनी त्याच्यावर जबरदस्ती केल्याचे सांगितले. त्यानुसार मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी आरसीएफ पोलिसांकडे तक्रार केली.