मुंबई : विधि विद्याशाखेच्या तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यामुळे २४४ विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्याबाबतचे तपशील कळवण्यात येतील, असे प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

विधि शाखेच्या तीन वर्षाच्या पदवी(एलएलबी) अभ्यासक्रमासाठी बुधवारी दोन सत्रात ऑनलाईन प्रवेश परीक्षा झाली. सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेच्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. एका केंद्रावरील २४४ विद्यार्थ्यांची परीक्षा त्यामुळे बुडली. काही विद्यार्थी परीक्षा देत असतानाच लॉग आऊट झाले. तर अनेकांना परीक्षा लॉग इन करताच आले नाही. सकाळी १३२ केंद्रावर ही परीक्षा झाली. परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे तपशील विद्यार्थ्यांना कळवण्यात येतील असे कक्षाने स्पष्ट केले आहे. दरम्यान दुपारच्या सत्रात परीक्षा सुरळीत झाल्याचे कक्षाकडून सांगण्यात आले. या सत्रात १२८ केंद्रांवर परीक्षा झाली. सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी २०२४१ विद्यार्थी होते. त्यापैकी १३ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात २० हजार २३२ विद्यार्थी होते. त्यापैकी १४ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.