रुग्णांकडून पैसे उकळणे, नोंदीमध्ये अफरातफर भोवली

मुंबई : रुग्णांकडून पैसे उकळणे, नोंदीमध्ये अफरातफर, कमी प्रतिसाद आदी कारणांमुळे राज्यभरातून ३५ रुग्णालयांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून बाद करण्यात आले असून नव्या ३२ रुग्णालयांचा यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. यात मुंबईतील तीन रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय उपचार उपलब्ध होऊ शकतील.

राज्यभरात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत एका कुटुंबाला दीड लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च मिळण्याची सुविधा असून यामध्ये ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ४५० रुग्णालये सहभागी आहेत. यातील ३५ रुग्णालयांची मार्च महिन्यापासून चौकशी सुरू होती. यामध्ये सुरुवातीला आठ रुग्णालये दोषी आढळल्याने जून महिन्यातच या योजनेतून त्यांना बाद करण्यात आले. मुंबई, जळगाव, अकोला, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर आणि वाशिममधील रुग्णालयांचा यात समावेश होता. यामध्ये भायखळा येथील बालाजी रुग्णालयही असून रुग्णांच्या आजारांचे निदान चुकीचे करणे, बिलांमध्ये फुगवटा दाखवणे, खोटे वैद्यकीय अहवाल सादर करणे आदी बाबी तपासणीदरम्यान आढळून आल्या होत्या. या चौकशीनंतर राज्यातील २७ रुग्णालयांना योजनेमधून काढून टाकण्याचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये अहमदनगर (२), अकोला (२), अमरावती (१), औरंगाबाद (४), धुळे (१), नागपूर (३), नाशिक (३), पालघर (१), पुणे (२), सांगली (१), सातारा (१), सोलापूर (१), ठाणे (२), मुंबई (१), वाशिम (१) येथील रुग्णालयांचा समावेश आहे. यातील मुंबई आणि ठाणे येथील दोन रुग्णालये मात्र योजनेतून स्वत:हून बाहेर पडली आहेत.जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये एकूण ३५ रुग्णालयांना योजनेतून काढून टाकण्यात आले असून बहुतांश रुग्णालयांमधून विमा कंपनीने पैसे दिले असले तरी रुग्णांकडून पैसे घेतलेले आढळून आल्याची माहिती महात्मा फुले जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

नव्या ३२ रुग्णालयांचा समावेश

काही रुग्णालयांना बाद केल्यानंतर राज्यभरातील ३२ नव्या रुग्णालयांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतले आहे. यात डहाणू, उस्मानाबाद आणि वर्धा येथील शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील माहीम येथील एस. एल. रहेजा, भेंडी बाजार येथील गेट वेल डायलिसिस सेंटर आणि हाजी अली येथील एन एच एसआरसीसी रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना या रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेणे शक्य होणार आहे.