मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्याप्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस प्रवासी संख्येत, उत्पन्नात, तिकीट-पास संख्येत नव्या नोंदी होत आहेत. ६ मे रोजी वातानुकूलित लोकलचा ३,७३७ प्रवाशांनी लोकल पास काढला. पश्चिम रेल्वेच्या आतापर्यंतच्या नोंदीमधील हा नवा विक्रम समाविष्ट झाला असून त्यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी ३,७१३ लोकल पास काढले होते. तसेच १५ एप्रिल रोजी ३,६७३ लोकल पास काढले होते.

हेही वाचा >>> मुंबई: विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.८४ कोटींची दंडवसुली

मुंबईत उष्णता वाढत असून, मे महिन्यात मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवास सुकर होण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात प्रवाशांची पावले वातानुकूलित लोकलकडे वळत आहेत. १ ते ६ मे दरम्यान वातानुकूलित लोकलची एकूण १,६०,६४५ तिकिटे आणि पास काढण्यात आले. यात १,४७,८३० तिकिटे आणि १२,८१५ पास समाविष्ट आहेत. हे प्रमाण मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक आहे. प्रवाशांचे वाढते प्रमाण वातानुकूलित लोकलची आवश्यकता दर्शवत आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> मुंबईत १८८ इमारती धोकादायक ; सर्वाधिक धोकादायक इमारती मालाडमध्ये, इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्याचे आवाहन

सध्या पश्चिम रेल्वेवरून आठवड्याच्या दिवशी ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. त्यासाठी ७ वातानुकूलित लोकल रेकचा वापर केला जातो. परंतु उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वातानुकूलित लोकलमध्ये वाढत असल्याने, प्रवाशांच्या सोयी आणि सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने वातानुकूलित लोकलचा एक रेक पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवणे शक्य होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एका दिवसात वातानुकूलित लोकलमधील सर्वाधिक प्रवासी

६ मे २०२४ – २,३९,३५४

४ मार्च २०२४ – २,३९,३५४

१५ एप्रिल २०२४ – २,३९,१८३

एका दिवसात सर्वाधिक वातानुकूलित लोकल पास काढणारे

६ मे २०२४ – ३,७३७

५ फेब्रुवारी २०२४ – ३,७१३

१५ एप्रिल २०२४ – ३,६७३