मुंबई: शीव पूर्व येथे चौथ्या मजल्यावरील उद्वाहनाच्या दारातून सात वर्षाची मुलगी शुक्रवारी खाली कोसळली. तिला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी शीव पोलिसांनी अपघाती मृत्यूच नोंद केली आहे.

शीव पूर्व येथील मासळी बाजाराजवळ ओम शिवशाही सोसायटीत दोन उद्वाहक आहेत. त्यातील एक उद्वाहक गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. उद्वाहक  बंद असल्यामुळे त्याचा दरवाजा नादुरुस्त झाला होता. या सोसायटीतील चौथ्या मजल्यावर लपाछपी खेळत असताना दिया सिद्धी विनायगम (७) दरवाज्या जवळ लपण्यासाठी गेली. त्यावेळी दरवाजा अचानक उघडला गेला व ती चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली.  मित्रांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यावेळी तळ मजल्यावरील दरवाजा बळाच्या सहाय्याने उघडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी दिया जखमी अवस्थेत पडली होती. कुटुंबियांनी इतर रहिवाश्यांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह शनिवारी कुटुंबियांना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.