मुंबईः दुचाकीच्या धडकेत २४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव सुनील राजपूत असून तो एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा. अपघातानंतर आरोपी दुचाकीस्वार पळून गेला असून  विक्रोळी पोलिसांनी त्याच्याविरूद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 विक्रोळीतील भांडुप पाचखड्डाजवळील पूर्व दुतग्रती महामार्गावर हा अपघात घडला. याप्रकरणी सुनीलचा भाऊ  अनिल  राजपूत याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल  ठाण्याच्या घोडबंदर रोड, कासारवडवलीतील कोठार चाळीत राहतो. सुनील एका खासगी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता तो पाचखड्डाजवळील पूर्व दुतग्रती महामार्गावर रस्ता ओलांडत असताना भरवेगात वेगात जाणार्‍या एका दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली. या अपघातात सुनील  गंभीररीत्या जखमी झाला. त्याला विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला  राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.   नंतर अपघाताची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man died in a two wheeler accident mumbai print news amy
First published on: 16-05-2024 at 09:19 IST