लोकांना ५० कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी मीरा रोड पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. योगेश करंडे ऊर्फ बंटी असे या आरोपीचे नाव आहे. बँकेने लिलावात काढलेले फ्लॅट्स स्वस्तात मिळवून देतो असे सांगत करंडे याने तब्बल ५०० लोकांना ५० कोटी रुपयांना फसविले होते. मीरा रोड येथे त्याने आणि त्याची पत्नी प्रीती कौर हिने अंबर बिल्डर्स नावाने आलिशान कार्यालय सुरू केले होते. बँकांनी लिलावात काढलेले फ्लॅट्स स्वस्त दरात मिळवून देतो असे आश्वासन ते लोकांना देत. अनेकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्याकडे पैसे देऊ केले होते. बंटी आणि त्याची पत्नी नंतर कार्यालयाला कुलूप ठोकून फरार झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नुकतीच मीरा रोड पोलिसांनी करंडे याला अटक केली होती. बुधवारी त्याला वसई येथील अंबाडी रोडवर असलेल्या बँकेत चौकशीसाठी नेले होते. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत अऊलकर आणि दोन पोलीस हवालदार सोबत होते. पण त्यांना चकमा देत तो पळून गेला.