सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, त्यानंतर समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन, NCB ने विविध अभिनेत्रींना पाठवलेलं समन्स या सगळ्या विषयांवर कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी त्यांची परखड मतं मांडली आहेत. ही मतं मांडत असताना संसदेत जे या प्रकरणाचे पडसाद उमटले होते त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. “बॉलिवूडची थाली घाणेरडीच असेल तर छेद केलाच पाहिजे” असं म्हणत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जया बच्चन यांना टोला लगावला आहे. त्यांनी ही टीका करताना जया बच्चन यांचं नाव घेतलं नाही. पण जिस थालीमें खाते हैं उस थालीमें छेद करते है हे वक्तव्य जया बच्चन यांनीच काही दिवसांपूर्वी संसदेत केलं होतं. त्यावरुन आता उज्ज्वल निकम यांनी त्यांना टोला लगावला आहे. एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले उज्ज्वल निकम?

“एका अभिनेत्रीने संसदेत मध्यंतरी असं भाष्य केलं की जिस थालीमें खाते हैं उस थालीमेंही छेद करते हैं! आता सगळीच तुमची थाली घाणेरडी असेल तर छेद केलाच पाहिजे. एनसीबीने चमकोगिरी न करता या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. ज्या बॉलिवूड कलाकारांची नावं या ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आली आहेत त्यांनी मनाची श्रीमंती दाखवून आपण जे कृत्य केलं आहे ते कबूल करावं” असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्स अॅप चॅटिंग हा या सगळ्या प्रकरणातला मोठा डॉक्युमेंट्री पुरावा आहे. असंही निकम यांनी म्हटलं आहे. मात्र हे सगळं भाष्य करत असताना त्यांनी जया बच्चन यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

जया बच्चन काय म्हणाल्या होत्या?

“मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातं. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या. याआधी अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडला ‘गटार’ म्हटलं होतं. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्सच्या अधीन गेल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं. चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे लज्जास्पद आहे. रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्ज सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात” अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली.