मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवरील गेल्या ५० वर्षांच्या निकालांवर नजर टाकल्यास मुंबई शहराचा कौल हा साधारणपणे एकाच पक्षाला किंवा आघाडीच्या बाजूने राहिला आहे. हा कल यंदाही कायम राहतो का, याची उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. यापैकी प्रत्येकी तीन जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकल्या होत्या. मुंबईचा कौल हा सर्वसाधारपणे केंद्रात सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या बाजूने असतो. १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला भरभरून यश मिळाले होते. तेव्हा मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. १९७७ मध्ये आणिबाणीनंतर जनता पक्षाची लाट आली तेव्हा मुंबईने जनता पक्षाच्या (भारतीय लोकदल) बाजूने कौल दिला होता.

हेही वाचा >>> मतपेढीसाठी भगवा नकोसा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप

१९८०चा मात्र अपवाद ठरला होता. कारण तेव्हा इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या पण मुंबईचा कौल हा जनता पक्षाच्या बाजूने होता. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत मुंबईने काँग्रेसला साथ दिली. १९९६ मध्ये नरसिंहराव सरकारचा पराभव झाला व भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते तेव्हा मुंबईतील सर्व सहा जागा युतीने जिंकल्या होत्या. १९९९ च्या कारगील युद्धानंतर भाजप सत्तेत आला तेव्हा मुंबईकर शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने उभे राहिले होते. २००४ मध्ये वाजपेयी सरकार जाऊन सत्ताबदल झाला तेव्हा मुंबईने काँग्रेसला साथ दिली. २००९ मध्ये देशात काँग्रेसप्रणित यूपीए पुन्हा सत्तेत आला तेव्हा मुंबईतील सर्व सहा जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत मुंबईने भाजप-शिवसेना युतीला साथ दिली. दोन्ही निवडणुकांमध्ये युतीचे सर्व सहा खासदार निवडून आले होते.

मुंबईचा कौल कसा?

● १९७१ – सर्व सहाही जागा काँग्रेस ● १९७७ – सर्व सहाही जागा जनता पक्ष (भारतीय लोकदल -५, मार्क्सवादी कम्युनिस्ट – १) ● १९८० – जनता पक्ष – ५, काँग्रेस – १ ● १९८४ – काँग्रेस – ५, अपक्ष – १(दत्ता सामंत) ● १९८९ – शिवसेना-भाजप – ४, काँग्रेस – २ ● १९९१ – काँग्रेस – ४, शिवसेना-भाजप – २ ● १९९६ – सर्व सहा जागा शिवसेना-भाजप युती ● १९९८ – काँग्रेस – ३, शिवसेना-भाजप युती – ३ ● १९९९ – शिवसेना-भाजप – ५, काँग्रेस – १ ● २००४ – काँग्रेस – ५, शिवसेना – १ ● २००९ – सहाही जागा काँग्रेस, राष्ट्रवादी ● २०१४ – सहाही जागा भाजप-शिवसेना युती ● २०१९ – सहाही जागा भाजप-शिवसेना युती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alliance or one party win six lok sabha seats in mumbai in last 50 years zws
First published on: 19-05-2024 at 05:03 IST