गणेशभक्तांच्या सेवेसाठी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल

गौरी-गणपतीच्या सणाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या घरी जातात.

एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी मानखुर्द येथे कामबंद आंदोलन केले.

राज्यभरातून आलेल्या चालक-वाहकांच्या खाण्या-झोपण्याचीही सोय नाही

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी जास्तीत जास्त बसगाडय़ा सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यभरातून आपल्या दोन हजारापेक्षा अधिक बसगाडय़ा मागवल्या आहेत. परंतु, या बसगाडय़ांसोबत आलेल्या वाहक-चालकांकडे महामंडळाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कुर्ला, नेहरूनगर आणि मानखुर्द येथे थांबलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाण्याची वा झोपण्याची व्यवस्था दूरच; पण पिण्याचे पाणीही त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी या कर्मचाऱ्यांनी काही वेळ काम बंद आंदोलनदेखील केले होते. मात्र वरिष्ठांनी समजूत घातल्यानंतर हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

गौरी-गणपतीच्या सणाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या घरी जातात. रेल्वे तसेच खासगी गाडय़ादेखील फुल्ल असल्याने या गणेशभक्तांच्या सोईसाठी एसटी महामंडळ दरवर्षी राज्यातून अधिक बस मागवतात. त्यानुसार या वर्षीदेखील २२१६ इतक्या गाडय़ांची सोय करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील विविध डेपोंमधून या बस मागवण्यात आल्या आहेत. दरवर्षी शहरातच मिळेल तिथे जागा घेऊन या बस उभ्या केल्या जातात. मात्र या वर्षी अनेक ठिकाणी मेट्रो आणि मोनोची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बस मानखुर्द जकात नाका आणि नेहरूनगर डेपो येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. कुर्ला नेहरूनगर येथे ४७६ बस तर मानखुर्द जकात नाका येथे ५०० बस उभ्या करण्यात आल्या आहेत.

येत्या तीन चार दिवसांतच तिकिटाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला कोटय़वधी रुपयांचा फायदा होणार आहे. मात्र हा फायदा करून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नेहरूनगर आणि मानखुर्द येथे या कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, जेवण, झोपण्याची सुविधा तसेच शौचालयाचीदेखील सुविधा नाही. गेल्या चार दिवसांपासून हे कर्मचारी अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री नेहरूनगर येथे तर बुधवारी सकाळी मानखुर्द येथे कामबंद आंदोलन केले. एकही कर्मचारी एसटीबाहेर काढत नसल्याने एसटीचे काही अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले.

अपघात झाल्यावर जबाबदार कोण?

संपूर्ण रात्र आम्हाला गाडी चालवायची आहे. मात्र या ठिकाणी झोपण्याची देखील सोय नसल्याने आम्ही रात्रभर गाडी चालवायची कशी, असा सवाल काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. ‘आम्ही कामबंद आंदोलन केल्यानंतर पोलीस आणि एसटीचे अधिकारी आम्हाला कामावरून कमी करण्याची धमकी देऊन गाडी चालवण्याची सक्ती करीत आहेत,’ असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी जी व्यवस्था असते, तशीच व्यवस्था यावेळीदेखील करण्यात आहे. मात्र दुसऱ्याच मागणीसाठी हे कर्मचारी आडमुठेपणा करीत आहेत. मात्र काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण केल्या जातील.

संजय सुपे, विभाग नियंत्रक मुंबई, परिवहन महामंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anesh chaturthi 2017 st bus employees

ताज्या बातम्या