मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सप्रमाणे अश्व शर्यतीचे आयोजन करून ठाणेकरांना घोडय़ांच्या शर्यतीचा थरार दाखविण्याचा अश्वपाल संघटनेचा प्रयत्न सोमवारी ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’च्या परवानगी अभावी पुर्णपणे फसला. स्पर्धेची तयारी अखेरच्या टप्प्यात सुरु असतानाच परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गावदेवी मैदान गाठले आणि ही स्पर्धा बेकायदेशीर असल्याचे सांगत ती आयोजकांना रद्द करण्यास सांगितली. त्यामुळे या अश्वशर्यतीचा थरार ठाणेकरांना अनुभवता आलाच नाही.
ठाणे येथील गावदेवी मैदानात सोमवारी अश्वपाल संघटनेने अश्व शर्यतीचे तसेच वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे संघटनेमार्फत गेल्या सहा वर्षांपासून आयोजन करण्यात येते. सोमवारी होणाऱ्या अश्वशर्यतीसाठी सुमारे ४० ते ५० घोडे गावदेवी मैदानात दाखल झाले होते. त्यामध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याण भागातील घोडय़ांचा समावेश होता. तसेच या घोडय़ांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठय़ा संख्येने जमले होते. अशा स्पर्धासाठी ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडीया’ची पुर्व परवानगी घ्यावी लागते पण, या स्पर्धेसाठी अशाप्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ही स्पर्धा बेकायदेशीर असल्याची तक्रार ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल्स’ पीटा या प्राणीमित्र संघटनेने ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडीया’कडे केली होती.
त्यानुसार, बोर्डाने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना ही स्पर्धा बेकायदेशीर असल्याचे कळविले होते. त्यामुळे गावदेवी मैदानात स्पर्धेची अखेरच्या टप्प्यात सुरू असतानाच पोलिसांची पथके धडकली आणि त्यांनी स्पर्धा बेकायदेशीर असल्याचे सांगत ती रद्द करण्यास सांगितले. या संदर्भात, अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष मकरंद केतकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गैरसमजातून स्पर्धा रद्द करावी लागल्याचे स्पष्ट केले. तसेच मुंबई परिसरातील घोडेवाल्यांचे हे संमेलन होते. घोडा आमच्या परिवाराचा सदस्य असून त्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यात घोडय़ांचे आरोग्य शिबीर, त्यांची निगा कशी राखावी यासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतात. त्याचबरोबर मनोरंजनासाठी अश्वस्पर्धा घेण्यात येतात. मात्र, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडीयाची परवानी नसल्यामुळे ऐनवेळी स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे संघटनेला आर्थिक भरुदड बसला आहे, असेही त्यांनी सांगितले.