मुंबई:  बेस्ट उपक्रमाने फक्त महिलांसाठी १०० बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊबिजेपासून या बस सेवेत दाखल होतील, अशी माहिती उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही मार्गांवर महिला विशेष, तर काही मार्गांवर बसप्रवेशात महिलांना प्राधान्यक्रम याप्रमाणे बस धावणार आहे. सध्या महिलांसाठी ३७ तेजस्विनी बस धावत आहेत.

 नोव्हेंबर २०१९ पासून फक्त महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवेत आणल्या. अशा ३७ तेजस्विनी बस दाखल झाल्या आहेत. सकाळी ८ ते सकाळी ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत तेजस्विनी बस महिलांसाठी असतात. करोनामुळे निर्बंध लागू झाल्याने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमीच होती; परंतु निर्बंध शिथिल झाल्याने बेस्ट प्रवाशांची संख्या वाढू लागली असून त्यात महिला प्रवासीही अधिक आहेत.

 वाढत जाणारी संख्या, त्यात उपक्रमात मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या बेस्ट बसगाड्या पाहता महिलांसाठी १०० बस चालवण्याचे नियोजन उपक्रमाने केले होते. त्यानुसार उपक्रमाने येत्या शनिवारपासून २७ आगारांतून महिलांसाठी १०० बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ७० मार्गांवर या बस धावतील.