मुंबई : वर्सोवा परिसरातील कोळीवाड्यातील रहिवाशांच्या समस्या गेली कित्येक वर्षे तशाच आहेत. या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोळीवाडा ही वर्सोवाची ओळख असली तरी या भागात मासेमारीसाठी चांगली जेट्टी नसल्याने अडचणींत भर पडली आहे.

मढ ते वर्सोवा या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल उभारण्याची मागणी येथील मच्छीमांरांनी वारंवार केली. मढ – वर्सोवा पुलामुळे या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणारा थेट मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगराला एक मोठा पर्यायी रस्ता मिळेल. सध्या या मार्गासाठी थेट मार्ग नसल्यामुळे तब्बल २२ किमीचा मोठा वळसा घालून जावे लागते. तसेच पावसाळ्यात ही बोट सेवा बंद ठेवावी लागते. त्यामुळे दोन किनाऱ्यांना जोडणाऱ्या मार्गाची गरज आहे. तसेच मासे विक्रीसाठी हा थेट मार्ग उपलब्ध होऊ शकेल, असे मच्छीमार संघटनेचे प्रतिनिधी संतोष कोळी म्हणाले.

हेही वाचा – परिवहन विभागात घोटाळा, ‘अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी

डिझेलच्या परताव्यांना विलंब

  • सर्वच कोळीवाड्यांचे प्रश्न सारखे असून त्याकरीता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीची गरज
  • कोळीवाड्यांचा विस्तार करण्याची गरज आहे. कोळीवाड्यांमध्ये अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या मच्छीमार कुटुंबांची संख्या वाढली आहे. असे असताना त्यांना नवीन घरे बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही.
  • मच्छीमार समाजाला दिले जाणारे डिझेलचे परतावे वेळेवर मिळत नाहीत.
  • समुद्रालगतच्या दिव्यांमुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी अतिरिक्त डिझेल लागते. मच्छीमारांना मासेमारीसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलचा परतावा उशिरा मिळतो.

हेही वाचा – मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

मासेमारी करून आलेल्या बोटींना मासे उतरवण्यासाठी चांगली जेट्टी आणि अन्य सोयी-सुविधाही उपलब्ध नसल्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. – राजेश शेट्ये, लोकप्रतिनिधी