अभिनेत्री आयेशा टाकियाचा पती आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे चिरंजीव फरहान आझमीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आझमी आणि त्यांच्या साथीदाराने १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

वांद्रे पोलिसांकडे काशिफ खान यांनी फरहान आझमी आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली. फरहानने माझ्याकडून रेस्टॉरंटसाठी साडे तेरा लाख रुपये घेतले होते. मात्र, या पैशांचा वापर दुसऱ्या कामांसाठी करण्यात आला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फरहान आझमी यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया दिली. तक्रारदार आणि माझ्यात व्यावसायिक वाद असून त्याने माझ्याविरोधात न्यायालयातही अनेक केसेस दाखल केल्या आहेत. त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे मला माध्यमांमधून समजले. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असून मी कायदेशीर मार्गाने लढा देत राहणार असे त्यांनी सांगितले.

‘कााशिद खान माझी पत्नी आयेशा टाकियाला धमकी देतो. तिच्याविरोधातही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी तो देतो. एखादा व्यक्ती असं कसं वागू शकतो, मी त्याच्याविरोधात कोर्टात जाणार’, असे फरहान आझमी यांनी नमूद केले.