लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या विस्ताराचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराने अनेक ठिकाणी अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदारावर योग्य कारवाई करून तो दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयांतील रुग्णांचा वाढता ओघ व रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार करण्याचे काम मुंबई महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार बोरिवली पश्चिमेकडील श्री. हरिलाल भगवती (एन.सी.टी.) महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा विस्तारही करण्यात येत आहे. इमारतीच्या जागेत मोठी इमारत बांधून गरीब व गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे कार्य महानगरपालिकेने केले आहे. परंतु, या इमारतीच्या कामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार कंत्राटातील अटी व शर्तीचे उल्लंघन करुन आपली मनमानी करीत आहे. तसेच अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याच्या तक्रारी येऊनही महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करून संबंधित कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत, असे आरोप करण्यात येत आहेत.

आणखी वाचा-अकरावी प्रवेश प्रक्रिया: शुक्रवारपासून अर्जाचा पहिला भाग भरता येणार, २२ व २३ मे अर्ज भरण्याच्या सरावासाठी वेळ

कंत्राटदाराने अशाप्रकारे काम करणे हा तमाम मुंबईकरांचा अपमान आहे, असे माझे मत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालून भगवती रुग्णालयाच्या कंत्राटदाराची चौकशी करावी. तसेच त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेच माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.