मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसचा दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्यात आली असून बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे पासधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांनी, तर मासिक पासच्या दरात १५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ मार्चपासून लागू होणार आहे.

करोनाकाळात घसरलेली बेस्टची प्रवासी संख्या पूर्ववत झाली असून बेस्टच्या बसगाड्या पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या वातानुकूलित बसगाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टने प्रवाशांच्या सुविधेसाठी मासिक पाससोबत दैनंदिन पास सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टच्या दैनंदिन आणि मासिक पासधारकांची संध्या १- लाख ४० हजार ९६५ इतकी आहे.

हेही वाचा >>>गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित

सुट्ट्या पैशांची समस्या सुटावी, दैनंदिन रोखीच्या व्यवहारातील असुरक्षितता दूर व्हावी, बेस्ट उपक्रमाच्या बस योजनेचा लाभ घेणे सोयीचे व्हावे, बेस्ट उपक्रमाचे उत्पन्न वाढावे यासाठी बेस्ट उपक्रमाने दैनंदिन आणि मासिक पासच्या दरपत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित योजनेनुसार ६ रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपयांपर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित व विनावातानुकूलित प्रवास भाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरुपात बसपास उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच अमर्याद बसप्रवासासाठी दैनंदिन पास ५० वरून ६० रूपये, तर मासिक पास ७५० रुपयांवरून ९०० रूपये करण्यात आला आहे. अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. तसेच दैनंदिन बसपासमधून अमर्याद प्रवासाची सुविधा कायम ठेवली आहे.

बेस्ट प्रशासनाने एप्रिल २०२३ मध्ये प्रवाशांसाठी सुधारित बसपास योजना लागू केली होती. आता १ मार्च २०२४ पासून नवीन पास योजना लागू करण्यात आली आहे. पूर्वीच्या बसपास योजनेमध्ये एकूण ४२ प्रकारचे बसपास उपलब्ध करण्यात आले होते. ती संख्या आता १८ वर आली असून २४ बसपास कमी करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या २,९४१ बसगाड्या असून यामधून दररोज ३३ ते ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मध्य आणि पश्चिम लोकलनंतर मुंबईत सर्वाधिक प्रवासी बेस्टने प्रवास करतात. बेस्टचे वातानुकूलित प्रवासाचे पाच किमीपर्यंतचे तिकीट ६ रुपये आणि सामान्य बस प्रवासाचे ५ रुपये तिकीटदर आहेत.

– सुधारित बसपास वातानुकूलित तसेच विना-वातानुकूलित बससेवांवर लागू आहेत. सर्वसाधारण तिकीट दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

– विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०० रूपये मूल्यवर्गाचा मासिक बसपास उपलब्ध असून या बसपासच्या सहाय्याने अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

– या योजनेतील सर्व बसपास ‘बेस्ट चलो ॲप’ अथवा ‘बेस्ट’ उपक्रमाने उपलब्ध केलेल्या विविध ‘स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहेत.

– ज्येष्ठ नागरीकांच्या मासिक बसपासमध्ये ५० रूपये सवलत कायम ठेवण्यात आली आहे.

– साप्ताहिक बसपासमध्ये कोणतीही सवलत नाही.

– महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेष परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना, तसेच ४० टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

– बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचारीसाठी असलेल्या १०० रूपये आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी असलेल्या ३६५ रूपये वार्षिक मूल्यवर्गाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रोखीच्या व्यवहारातील असुरक्षितता टाळण्यासाठी, सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडविण्यासाठी सुधारित बसपास दर लागू केले आहेत. बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्न वाढवून प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतला आहे, असे बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्याने सांगितले.