मुंबई महापालिकेचे आर्थिक पाठबळ नसलेल्या बेस्टचा वातानुकूलित बसचा प्रवास १ जुलैच्या भाडेकपातीनंतर ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बससेवेपेक्षा किलोमीटरमागे ५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवासी बेस्टच्या वातानुकूलित बससेवेला अधिक पसंती देण्याची चिन्हे आहेत.
mv04बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे दोन किलोमीटरच्या अंतरासाठी मिळणारे २० रुपयांचे तिकीट ३० रुपये झाले होते. परिणामी, बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठय़ा प्रमाणात घसरण झाली होती, म्हणून १ जुलैपासून बेस्टच्या वातानुकूलित बस गाडय़ांचा प्रवास स्वस्त करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या तुलनेत महाग असलेला प्रवास किलोमीटरला ५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
सध्या बेस्टद्वारे मुंबई व उपनगरात महापालिका हद्दीबाहेर जाणाऱ्या २३ मार्गावर सुमारे २६९ बस गाडय़ा सोडल्या जातात. नवी मुंबई, ठाणे बससेवेचे भाडे तुलनेत कमी बेस्टला प्रवासी मिळेनासे झाले होते, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून वातानुकूलित प्रवास स्वस्त करण्यात आल्याचे ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेचे आर्थिक पाठबळ मिळत नाही, हे खरे आहे. मात्र मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या बेस्टला सावरण्यासाठी आम्ही जोखीम उचलून हे पाऊल टाकले आहे. प्रवासी बेस्टच्या पाठीशी खंबीर उभे राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.
-डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम