मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमसह देशद्रोहाच्या आरोपींशी संबंध असल्याच्या आरोपांवरून झिडकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याबाबतच्या पत्रप्रपंचामुळे पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याने भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे. मलिक यांना महायुतीपासून दूर ठेवण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत मलिक यांचे छुपे सहकार्य मात्र भाजप घेणार आहे, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहाराचे आरोप केले होते. मुंबई बाँबस्फोटातील आरोपीशी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळाला आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी मलिक यांनी विधानसभेत हजेरी लावली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होऊन सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठल्यावर अस्वस्थ झालेल्या फडणवीस यांनी लगेच पवार यांना खुले पत्र लिहून मलिक यांच्यावर आरोप असेपर्यंत त्यांना महायुतीपासून दूर ठेवण्याची सूचना केली. फडणवीस यांनी खासगीत सांगण्याऐवजी जाहीरपणे सूचना केल्याने पवार गट अस्वस्थ असून त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे ही बाब नेली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याने फडणवीस व अन्य नेत्यांनी मलिकप्रकरणी मौन बाळगले आहे. मलिक यांनी पुढील आठवड्यात शक्यतो विधिमंडळ कामकाजात सहभागी होऊ नये किंवा सत्ताधारी बाकांवर न बसता तूर्तास तटस्थ रहावे, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा – जयंत पाटील गटाचे नेते, कार्यकर्त्यांना अजितदादांचे आकर्षण

मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची भाजपची तयारी नसली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरमध्य लोकसभा मतदारसंघात त्यांचे छुपे सहकार्य मात्र भाजप घेणार आहे. मलिक यांचे कुर्ला व मुस्लिम बहुल पट्ट्यात प्राबल्य आहे. त्यांनी मतदारनोंदणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. भाजपच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील सहा जागांपैकी उत्तरमध्य मतदारसंघ जिंकणे, हे सर्वात अवघड आहे. मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची संख्या सुमारे साडेचार लाख असून हा वर्ग भाजपविरोधात व काँग्रेसला मतदान करतो. भाजप खासदार पूनम महाजन यांचे मताधिक्य २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये सुमारे ५० हजाराने घटले होते. दोन वेळा खासदार राहिल्याने अँटी इन्कबन्सीचा मुद्दा आणि महायुती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नाराजी याचा फटका महाजन यांना बसू शकतो. त्यामुळे मलिक यांनी महाजन यांच्या विरोधात काम न करता मुस्लिम समाजाचे विरोधी मतदान होऊ नये, यासाठी छुपी मदत भाजपला अपेक्षित आहे. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारित असून मलिक हे अजित पवार गटाबरोबर राहिल्यास त्यांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन पुढे सुरू राहू शकतो आणि निर्दोषत्व सिद्ध होण्यासाठीही मदत केली जाऊ शकते.

हेही वाचा – दानिश अली यांच्यावर निलंबनाची कारवाई; महुआ मोईत्रा यांचे समर्थन केल्यामुळे बसपाचा निर्णय?

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, याला भाजपचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे मलिक हे महायुतीमध्ये भाजपला नकोसे असले, तरी युद्धात किंवा निवडणुकीत सर्व काही क्षम्य असते, या न्यायाने भाजप मलिक यांची छुपी मदत घेणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders are silent about nawab malik due to displeasure of party leaders print politics news ssb