महिला कार्यकर्त्यांना सभाशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रण
आगामी पालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपने संभाव्य महिला उमेदवारांना राजकीय ज्ञानामृत पाजण्यासाठी ‘ज्ञानयज्ञ’ आरंभला आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या महिला कार्यकर्त्यांना महापालिकेच्या कामकाजाचे धडे गिरविण्यासाठी अखिल भारतीय स्थानीय स्वराज्य संस्था अथवा पालिकेच्या चिटणीस विभागातील अधिकाऱ्यांऐवजी पालिकेच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची मदत घेतली. पालिका सभागृहाच्या कामकाजाचा फारसा अनुभव नसलेल्या उपशिक्षणाधिकाऱ्यांनाच या कामासाठी भाजपने का निवडले, असा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण विभागातही त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकीत पालिकेमध्ये कमळ फुलविण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांमधील निवडून येण्याची क्षमता असलेल्या विद्यमान नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या मागावर भाजप नेते आहेत. ठिकठिकाणी चाचपणी करून असे उमेदवार हुडकण्याची जबाबदारी भाजपने काही मंडळींवर सोपविली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या विचारात असलेल्या भाजपने आतापासून ५० टक्के आरक्षणानुसार महिला उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. तसेच पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची माहिती देऊन उत्कृष्ट लोकप्रतिनिधी घडविण्याची प्रक्रिया भाजपने या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपमधील इच्छुक महिला उमेदवारांना जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी जिवबा केळुसकर यांना भाजपने आमंत्रित केले होते. मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दोन दिवस उपस्थित राहता यावे यासाठी उपमहापौर अलका केरकर यांनी थेट अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांना पत्र पाठवून परवानगी देण्याची विनंती केली होती. जिवबा केळुसकर यांना सभागृहाच्या कामकाजाची फारशी माहिती नाही, शिक्षण समितीच्या गेल्या काही बैठकांमध्ये ते उपस्थित असतात. परंतु विरोधकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर भाजप सदस्य त्यांच्या मदतीला धावत असल्याचे समितीच्या बैठकीत अनेक वेळा दिसून आले आहे. पालिकेच्या शिक्षणाधिकारी शांभवी जोगी सध्या भाजपला नकोशा झाल्या आहेत. त्यांना पदावरून हटविण्यासाठी अनेक प्रयत्न करून झाले. मात्र शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्ष जोगी यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे भाजपची कोंडी झाली. आता जोगी यांचे सर्व अधिकार काढून केळुसकर यांना देण्यात आले आहेत. त्याच राजकारणातून केळुसकर यांना प्रशिक्षण देण्यासाठी भाजपने आमंत्रित केल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.
वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी अथवा राजकारणात प्रवेश करणाऱ्यांना लोकसभा, विधानसभा, महापालिका आदींचे कामकाज कसे असते, लोकप्रतिनिधींना कोणते अधिकार असतात आदींबाबत अखिल भारतीय स्थानीय स्वराज्य संस्था या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. मात्र भाजपने या संस्थेची मदत घेतली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या चिटणीस विभागातील अधिकारी पालिका सभागृह, वैधानिक आणि विशेष समित्यांचे कामकाज पाहात असतात. पालिका अधिनियमांबाबत या अधिकाऱ्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे भाजपने या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलावले असते तरी या महिला कार्यकर्त्यांना उत्तम मार्गदर्शन झाले असते. परंतु हे टाळून भाजपने उपशिक्षणाधिकाऱ्यांना आमंत्रित केल्याबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.