महापालिकेच्या कारवाईनंतरही बेकायदा बांधकाम केल्याचे उघड

मुंबई : वडाळ्याच्या गणेश मंदिर मार्गावर पुन्हा उभारण्यात आलेले बेकायदा ‘साईधाम मित्रधाम मंडळ मंदिर’ जमीनदोस्त करण्याऐवजी त्याला पुढील आदेशापर्यंत टाळे ठोका, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिकेला दिले. एकदा जमीनदोस्त केलेले हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांची बाजू ऐकल्यावरच मंदिरावर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले जातील, असेन्यायालयाने या वेळी प्रामुख्याने स्पष्ट केले.

हे मंदिर २०१८ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यानंतर परवानगीशिवाय काही स्थानिकांनी पुन्हा हे मंदिर बांधले. ही बाब माहीत असूनही पालिकेने कारवाई केली नाही, अशी याचिका करण्यात आली होती. त्यावर दुसऱ्यांदा बांधण्यात आलेले हे बेकायदा मंदिर टाळेबंदीनंतर पुन्हा जमीनदोस्त करण्यात येईल. तोपर्यंत तेथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे पालिकेने न्यायालयाला सांगितले होते. त्या दृष्टीने न्यायालयाने पालिकेला आदेश दिले होते. परंतु टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आल्यावरही मंदिर जमीनदोस्त केलेले नाही. किंबहुना गणेशोत्सवात लोकांना तेथे प्रवेश दिल्याचा आरोप करत फ्लेचर पटेल यांनी पालिकेविरोधात अवमान याचिका केली आहे.

‘जमीनदोस्त मंदिर कुणी उभे केले?’

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या अवमान याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी गणेशोत्सवात मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाऊ नये किंबहुना टाळेबंदी उठेपर्यंत तेथे कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये, असे पालिका आणि पोलिसांना बजावण्यात आले होते. त्यानंतरही १९ मेच्या आपल्या आदेशाचा पालिकेकडून अवमान झाल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच जमीनदोस्त केलेले हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ते कोणी उभे केले हे पालिकेला माहीत नाही का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर पालिकेने आदेशाचे उल्लंघन झाल्याचे मान्य करत दोन आठवडय़ांत कारवाई करण्याचे आश्वासित केले. मात्र हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले त्यांचे म्हणणे ऐकल्यावरच या प्रकरणी योग्य ते आदेश देऊ, असे स्पष्ट केले. तसेच तोपर्यंत मंदिराला टाळे ठोकण्याचे पालिकेला बजावले.