संदीप आचार्य

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण एकीकडे जोरात तापत असतानाच दुसरीकडे वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यातच सुमारे ३३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तायार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांसह विविध यंत्रणांना पाठवली आहे.

राज्यात उष्णतच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. तसेच लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून नियमितपणे आपले अहवाल आरोग्य विभागाच्या पोर्टलवर संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे ज्या भागात उष्णता विकारांचे प्रमाण वाढलेले आढळेल तेथे तात्काळ आरोग्य यंत्रणेला तसेच महापालिकांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे डेथ ऑडिट जिल्हास्तरिय डेथ ऑडिट समितीकडून एका आठवड्यात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक

देशात १९९२ ते २०१५ या काळात उष्णतेच्या लाटेमुळे २२,५६२ लोकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात २०२३ मार्च ते जुलै महिन्यात राज्यात ३,१९१ लोकांना उष्माघाताचा फटका बसून रुग्णालयात दाखल करावे लागले होते तर याच काळात राज्यात २२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. मुंबई महापालिका क्षेत्रात १५५ लोकांना उष्माघाताचा फटका बसला होता तर अमरावती १२५, बुलढाणा ४३, चंद्रपूर १९६, लातूर १९०, नागपूर ३६२, नंदुरबार २२०,नांदेड ९६, पुणे ४०९, रायगड ४१२, ठाणे १५६, वर्धा ३४० आणि यवतमाळमध्ये ९७ जणांना उष्माघाताचा फटका बसला होता. यंदा मार्च महिन्यात राज्यात ३३ जणांना आतापर्यंत उष्माघाताचा फटका बसून रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या पर्श्वभूमीवर कोणत्या वर्गाला उष्माघाताचा फटका बसू शकतो याचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना व कृती आराखडा आरोग्य विभागाने तयार केल्याचे डॉ नितीन अंबाडेकर म्हणाले. उन्हाचा फटका बसू नये यासाठी काय काळजी घ्यावी तसेच कोणते कपडे परिधान करावे याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत असली तरी तापत्या राजकीय वातावरणाचा विचार करून आरोग्य यंत्रणेला सज्ज राहाण्यास सांगण्यात आले आहे.