scorecardresearch

सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारचा मोठा निर्णय

सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ED-CBI

सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. या केंद्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका खटल्यात निकाल दिला. यावेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकाळ वाढवण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आहे.

या अध्यादेशानुसार, अंमलबजावणी संचलनालयाचे संचालक ज्या कालावधीसाठी आपले पदग्रहण करतो, तो कालावधी सेक्शन (अ) नुसार समितीच्या शिफारशीनुसार आणि लिखित स्वरूपात दिल्या गेलेल्या कारणांनुसार एका वेळी एका वर्षासाठी वाढवण्यात येऊ शकतो. अर्थात, हे केवळ पाच वर्षांपर्यंतच करता येते. पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर संचालकाचा कालावधी वाढवता येत नाही. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ होता आणि १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

विशेष म्हणजे, विरोधकांतर्फे सरकारवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. अशा वेळी तपास यंत्रणांच्या संचालकांचे कार्यकाळ वाढवणे हा चर्चेचा विषय ठरत आहे. सीबीआय, ईडी आणि इतर तपास यंत्रणांमार्फत आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अर्थात, या संस्था नियमांनुसारच वागत आहेत, आणि सरकार त्यांच्या कामात कसलीही ढवळाढवळ करत नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 17:14 IST

संबंधित बातम्या