थंडीला पोषक स्थिती; काही ठिकाणी दाट धुकेही

राज्याच्या बहुतांश भागातील ढगाळ वातावरणाची स्थिती निवळत असून, कोरडे हवामान निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलामुळे थंडीला पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या आठवडय़ात राज्यात सर्वच ठिकाणी गारवा वाढणार आहे. काही ठिकाणी दाट धुकेही पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीपासून राज्यातील तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार झाले. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाची स्थिती, तसेच मध्य भागातातील कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. परिणामी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली होती. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊसही झाला. सरासरीच्या आसपास गेलेले विदर्भातील तापमान त्यामुळे पुन्हा वाढले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यात सर्वच ठिकाणी कोरडे हवामान निर्माण होत आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू आहेत. या संपूर्ण आठवडय़ात राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती कायम राहणार आहे.  त्यामुळे एक-दोन दिवसांत गारव्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या संध्याकाळनंतर काहीसा गारवा जाणवत असून, पहाटे त्याची तीव्रता वाढत आहे. मात्र, या आठवडय़ात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या किमान तापमानात घट

गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात चार अंशाने घट झाली आहे. रविवारी किमान तापमान १८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. शुक्रवारपासून मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली. किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्य़ांमध्ये किमान तापमान कमी झाले. राज्यात गेल्या आठवडय़ात अनेक ठिकाणी किमान तापमान ११ ते १४ अंश सेल्सियसदरम्यान होते. रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. राज्यात किमान तापमान कमी झाले असताना कमाल तापमान मात्र अजूनही ३० अंश सेल्सियसच्या आसपासच राहिले आहे.