लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील १३ मतदार संघात चांगले मतदान झाले. मुंबईत तर मागील निवडणुकीच्या तुलनेत मतटक्का वाढला असून केवळ १५ ते २० ठिकाणीच मतदान संथ असल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. या अपवादात्मक घटना वगळता पाचव्या टप्प्यात आणि एकूणच राज्यातील मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडल्याचा दावा निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांनी केला.

निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्यात मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील १३ मतदार संघात सोमवारी मतदान पार पडले. मात्र, मतदानासाठी तासंतास रांगेत उभे राहवे लागल्याने तसेच मतदान केंद्रावर पाणी, मंडप अशा कोणत्याही सुविधा नसल्याने अनेक मतदारांनी आयोगाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील संथ मतदानाबद्ल नाराजी व्यक्त करीत आयोगाच्या कारभारावर आक्षेप नोंदवले होते. ठाकरे यांनी तर ‘निवडणूक आयोग भाजपचा घरगडी’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप करीत आपला संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा >>>विज्ञान प्रवेशासाठी चढाओढ; मुंबई विभागाच्या निकालात यंदा तीन टक्क्यांची वाढ

आयोगाकडून खंडन

निवडणूक आयोगाने मात्र संथ मतदानामुळे मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा राजकीय पक्षांच्या आरोपांचे खंडन केले आहे. १३ मतदार संघातील २४ हजार ५७९ मतदान केंद्रापैकी सुमारे १२ हजार मतदान केंद्रे मुंबईत होती. त्यापैकी १५ ते २० ठिकाणी संथ गतीने मतदान सुरू असल्याच्या, मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या. सध्यांकाळी ६ वाजता मतदानाची वेळ संपली त्यावेळी रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. आयागोच्या अधिकाऱ्यांनी सहा वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रावरील मतदारांचा आढावा घेतला त्यावेळी केवळ ३० मतदान केंद्रावर रांगा होत्या. मात्र एक दोन घटनांना राजकीय वळण देत आयोगाच्या एकूणच नियोजनावर आक्षेप घेणे उचित नसल्याचेही उच्चपदस्थांनी सांगितले.

मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी राज्यातील पहिल्या चार टप्यातील मतदान ६२.९४ टक्के असून पाचव्या टप्यातील मतदान ५४.३३ टक्के असून मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही टक्केवारी ५८ टक्यांपर्यंत जाईल. त्यामुळे राज्यातील मतदानाची टक्केवारी २०१९च्या तुलनेत अधिक असेल. मुंबईतील मतदानही अधिक असेल. मुंबईतील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून आयोगानेही योग्य नियोजन केल्याने मतटक्का वाढल्याचा दावाही या अधिकाऱ्यांने केला.

पाचव्या टप्प्यात १३ मतदारसंघांतील निवडणूक आयोगाकडून सायंकाळी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी : ठाणे – ५२.०९ टक्के, उत्तर मुंबई ५७.०२ टक्के, उत्तर मध्य मुंबई ५१.९८ टक्के, ईशान्य मुंबई ५६.३७ टक्के, वायव्य मुंबई ५४.८४ टक्के, दक्षिण मुंबई ५०.०६ टक्के, दक्षिण मध्य मुंबई ५३.६० टक्के, नाशिक ६०.७५ टक्के, पालघर ६३.९१ टक्के, भिवंडी ५९.८९ टक्के, धुळे ६०.२१ टक्के, दिंडोरी ६६.७५ टक्के. मुंबईतील बोरिवली ६२.५० टक्के तर मुलुंड ६१.३३ टक्के या दोनच विधानसभा मतदारसंघांमघ्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. ठाणे मतदारसंघात ठाणे शहरात ६० टक्के मतदान झाले. यंदा मुंबईत जास्त मतदानासाठी प्रयत्न झाले होते, पण मुंबईकरांनी तेवढा पाठिंबा दिला नाही. निरुत्साह कायम होता.