रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी बुधवारी जाहीर केलेल्या भाडेवाढीनंतर नेमकी भाडेवाढ किती झाली याबाबत मुंबईच्या रेल्वे कार्यालयांमध्ये २४ तासानंतरही गोंधळाचे वातावरण आहे. नेमकी भाडेवाढ किती झाली याबाबत रेल्वेच्या मुख्य वाणिज्य अधिकाऱ्यांना रेल्वे बोर्डाकडून निश्चित सूचना आल्या नसल्याने गुरुवारी सायंकाळी उशीरापर्यंत उपनगरी भाडय़ाचे दर निश्चित झाले नव्हते.
रेल्वेमंत्र्यांनी बुधवारी प्रवासी भाडय़ामध्ये २ ते १० पैशांपर्यंत वाढ केल्याचे जाहीर केले. त्यावेळी रेल्वे मंत्रालयाने दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात होत असलेली भाडेवाढ यात तफावत असल्याचे लक्षात येताच रेल्वे बोर्डाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुन्हा अभ्यासण्यासाठी मागून घेतला आणि त्यावर रेल्वे मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने पुन्हा आकडेमोड करण्यास सुरुवात केली. परिणामी रेल्वेच्या विविध विभागांमध्ये निश्चित भाडेवाढीचे आकडे जाहीर होऊ शकले नाहीत.
बुधवारी सायंकाळी पश्चिम आणि मध्य रेल्वेने जाहीर केलेली अंदाजित आकडेवारीही फसवी असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. रेल्वेमंत्र्यांनी दोन पैसे प्रतिकिमी भाडेवाढ सांगितली असताना आकडेवारीमध्ये पाच किमीला चक्क एक रुपया भाडेवाढ होत होती. हाच प्रकार मूळ भाडय़ामध्ये झाला होता. मूळ भाडे नेमके कोणते हेही निश्चित होत नव्हते. कारण काही महिन्यांमध्ये झालेली भाडेवाढ वेगवेगळ्या कारणांमुळे झाली होती आणि प्रवासी भाडय़ामध्ये विविध कर आणि अधिभारांचा समावेश आहे. हे सर्व वगळून मूळ भाडे धरणार की केवळ मुंबई उपनगर वाहतूक प्रकल्पाचा १ जानेवारीला असलेला अधिभार वगळणार हेही रेल्वे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. हा प्रकार गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होता.
विकास शुल्क हे रेल्वेच्या मूळ भाडय़ात अंतर्भूत केले असले तरी पाच रुपयांच्या पटीमध्ये भाडे ठरविण्यासाठी रात्री उशीरापर्यंत वाणिज्य विभाग आकडेमोड करण्यात व्यस्त होता. . मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे विचारणा केली असता रेल्वे बोर्डाने अद्याप कोणतीही आकडेवारी निश्चित केली नसल्याने भाडेवाढ किती झाली हे सांगणे कठीण असल्याचे सांगण्यात आले.

रेल्वेमंत्र्यांनी दोन पैसे प्रतिकिमी भाडेवाढ सांगितली असताना आकडेवारीमध्ये पाच किमीला चक्क एक रुपया भाडेवाढ होत होती. हाच प्रकार मूळ भाडय़ामध्ये झाला होता. मूळ भाडे नेमके कोणते हेही निश्चित होत नव्हते. कारण काही महिन्यांमध्ये झालेली भाडेवाढ वेगवेगळ्या कारणांमुळे झाली होती आणि प्रवासी भाडय़ामध्ये विविध कर आणि अधिभारांचा समावेश आहे.