मुंबई : जागावाटपावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असली तरी आघाडी धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला आहे. सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका स्थानिक नेत्यांनी मांडली होती. याबरोबरच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ पक्षाला मिळावा म्हणून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड आग्रही होत्या. या संदर्भात पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत नेतृत्वाशी चर्चा केली. आघाडीचा धर्म पाळावा, असा सल्ला राज्यातील नेत्यांना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्राने दिली.

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचा प्रचार करू, अशी भूमिका वर्षां गायकवाड यांनी मांडली. सांगलीत पक्षाचे इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. ते दुसरा अर्ज काँग्रेस उमेदवार म्हणून भरणार असले तरी पक्षाचे अधिकृत (ए व बी फॉर्म) त्यांना देण्यात आलेले नाही. उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन मतदारसंघांतील पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे केरळमध्ये प्रचारात आहेत. परिणामी मुंबईतील दोन्ही जागांचा निर्णय हा २० तारखेनंतरच होईल, असे सांगण्यात आले.

विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली : अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस उमेदवारीची आशा कायम ठेवत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, मंगळवारीही जोरदार शक्तिप्रदर्शनाने त्यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> चावडी : पार्सल बीड की दिल्लीला जाणार?

काँग्रेसचा बहिष्कार

महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सांगलीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेनेचे  व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील उपस्थित होते. मात्र काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

उमेदवारी मागे घेण्यास तयार – चंद्रहार पाटील

सांगली : माझी व माझ्या उमेदवारीची  अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार  आहे. मात्र, शेतकऱ्याचा मुलगा  खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे पुढे येऊन सांगावे, असे आव्हान उबाठा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सोमवारी मविआच्या बैठकीत दिले.