scorecardresearch

आघाडीबाबत काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरात निर्णय ; एक व्यक्ती, एक पदाची अंमलबजावणी

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टिळक भवनात प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली.

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या १ व २ जून रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर येथील संकल्प शिबिरातील निर्णयानुसार राज्यात काँग्रेस पक्षसंघटनेत एक व्यक्ती, एक पद या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्याचे पक्षाचे प्रभारी पाटील यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टिळक भवनात प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होत आहे. राज्यात पुढील काही महिन्यांत होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची किंवा कसे, या संदर्भात शिबिरात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

या शिबिरानंतर ९ ते १४ जूनदरम्यान जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त सर्व जिल्ह्यांत ९ ते १५ ऑगस्टदरम्यान ७५ किमीची ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढली जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही व संविधान व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. ब्रिटिशांविरोधात लढलो, तसेच आता या भाजपविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांना लढावे लागणार

आहे.

काँग्रेस पक्ष बळकट करण्यावर भर देऊ आणि एक दिवस पुन्हा काँग्रेसचीच सत्ता देशात व राज्यात येईल, यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress to decide on alliance with ncp shiv sena in local body election in state level camp zws