|| प्रसाद रावकर

संख्या आटल्याने रुग्णांना एकाच विभागात दाखल करणार

मुंबई : करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने जम्बो करोना केंद्रे सज्ज केली होती. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर बनल्यामुळे जम्बो केंद्रांवरील खर्चाला आवर घालण्याचा आणि मनुष्यबळावरील वाढलेला ताण हलका करण्यासाठी प्रशासनाने या केंद्रातील चार-पाच विभागांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना एकाच विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आजघडीला जम्बो केंद्रांमध्ये खाटांच्या क्षमतेच्या तुलनेत १० टक्के रुग्णही दाखल नाहीत.

मुंबईत दुसरी लाट ओसरत आहे. बहुतांश निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतरही दैनंदिन नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणातच आहे. करोनाची तिसरी लाट आणि लहान मुले बाधित होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने करोना जम्बो केंद्रे सुविधांनी सज्ज ठेवली. तसेच काही प्रमाणात रुग्णशय्यांची क्षमताही वाढविण्यात आली. मात्र आजघडीला जम्बो करोना केंद्रांमध्ये १० टक्के रुग्णही दाखल नाहीत.

जम्बो करोना केंद्रांचे व्यवस्थापन आणि देखभालीवर आजघडीला मोठा निधी खर्च करावा लागत आहे. तसेच रुग्ण सेवेसाठी कर्मचाऱ्यांची मोठी फौजही तेथे तैनात करण्यात आली आहे. जम्बो करोना केंद्रांतील चार-पाच विभागांमध्ये तुरळक संख्येने रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे या विभागांची देखभालीवर खर्च होत आहे. तसेच तेथे कर्मचारी वर्गही उपलब्ध करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन या केंद्रांतील एकाच विभागात रुग्णांना दाखल करण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे.

गोरेगावमधील नेस्को, वांद्रे कुर्ला संकुल, वरळीमधील एनएससीआय, मुलुंड (पश्चिम), रिचर्ड अ‍ॅण्ड क्रुडास आदी जम्बो करोना केंद्रांबाबत वरील निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने तेथे अत्यंत तुरळक रुग्ण दाखल आहेत. मात्र ते विविध विभागांमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. एकाच विभागात रुग्णांना ठेवल्यानंतर त्यांची देखभाल करणे, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे सोयीचे ठरेल आणि खर्चाचीही बचत होईल. मात्र असे असले तरी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्य विभाग सज्ज ठेवण्यात येणार आहेत. तूर्तास तेथे रुग्णांना दाखल करण्यात येणार नाही, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मुंबईतील जम्बो केंद्रांमध्ये सध्या चार ते पाच विभाग कार्यरत आहेत. परंतु प्रत्येक विभागात अत्यंत कमी रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना आता केंद्रातील एकाच विभागात ठेवण्यात येईल. त्यामुळे केंद्रावर होणाऱ्या खर्चात बचत होईल आणि मनुष्यबळाचे नियोजनही योग्य पद्धतीने करता येईल. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका