मुंबई:  करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे पुन्हा एकदा देशात भीतीची छाया पसरली असतानाच विधिमंडळाच्या सभागृहात विना मुखपट्टी बसणाऱ्या तसेच आवारात मुखपट्टीशिवाय फिरणाऱ्या बेफिकीर लोकप्रतिनिधींवर उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी चांगलेच संतापले. करोनाचे संकट अजून गेलेले नाही. ओमायक्रॉनचा धोका आहेच, पण अजून नवीन विषाणूही आला आहे, राज्यातील जनता तुम्हाला पाहते आहे याचे गांभीर्य ठेवून मुखपट्टी लावा अशा स्पष्ट शब्दात पवार यांनी मंत्री आणि सदस्यांनाही खडसावले.

 राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विधिमंडळात येणाऱ्या सर्वांना लसीकरण आणि करोनाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र विधिमंडळाच्या आवारात आमदार, त्याचे कार्यकर्ते, अधिकारी अनेक वेळा तोंडावर मुखपट्टी न लावताच फिरत असतात. सभागृहातील कामकाजाबाबत माध्यमांशी संवाद साधतानाही मंत्री वा आमदार मुखपट्टी लावत नाहीत. एवढेच नव्हे तर सभागृहातही सदस्य मुखपट्टी न लावताच बसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा मंत्री आणि आमदारांना चांगलेच धारेवर धरले. आपण लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करता. करोनाचे संकट असून संपलेले नसून आपण मात्र त्याबाबत गंभीर नाही असे सांगतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही करोनाची गंभीर दखल घेतली आहे, असे पवार म्हणाले.