मुंबई पोलीस दलात पुढील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून गुन्हे अन्वेषण विभागातील सहआयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. विद्यमान सहआयुक्त हिमांशू रॉय यांना तीन वर्षे पूर्ण झाल्याने तर निकेत कौशिक यांच्या बढतीमुळे पहिल्यांदाच गुन्हे विभागातील दोन महत्त्वाची पदे रिक्त होत आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त म्हणून व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या तर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी परमबीर सिंग यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक देवेन भारती, धनंजय कमलाकर, प्रशांत बुरडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. परमबीर सिंग यांनी गुन्हे विभागातील महत्त्वाचे असे उपायुक्तपद भुषविले आहे. त्यांच्या काळातच सर्वाधिक चकमकीत कट्टर गुंड ठार झाले. रॉनी मेंडोंसा मुंबईचे आयुक्त असताना संघटित गुन्हेगारीविरोधात आघाडी उघडण्यासाठी उपायुक्तांचे विशेष पद निर्माण करण्यात आले होते. त्याजागी परमबीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. संघटित गुन्हेगारीची खडान्खडा माहिती असलेल्या सिंग यांच्याच नियुक्तीची जोरदार चर्चा आहे.
गुन्हे विभागातील उपायुक्त हे पद पूर्वी महत्त्वाचे मानले जायचे. उपायुक्त म्हणून सध्या एटीएसला असलेले प्रदीप सावंत यांनी चांगलीच छाप उमटविली होती. त्यांच्या काळात गुन्हेगारीचा कणा पार मोडला गेला होता. आता मात्र गुन्हे विभागातील अतिरिक्त आयुक्त हे पद महत्त्वाचे मानले जात आहे. देवेन भारती हे उपायुक्त म्हणून गुन्हे विभागात आले आणि त्यांना तेथेच अतिरिक्त आयुक्त म्हणून बढती मिळाली. तेव्हापासून गुन्हे विभागाचे अतिरिक्त आयुक्त हे पद महत्त्वाचे म्हणून गणले गेले. कौशिक यांना महानिरीक्षकपदी बढती मिळणार असल्यामुळे आता विश्वास नांगरे-पाटील, ब्रिजेश सिंग यांची नावे घेतली जात आहेत.
मुंबईच्या आयुक्तपदी कोण?
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची नियुक्तीही दोन-तीन दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे. सेवाज्येष्ठतेनुसार अहमद जावेद यांचे नाव आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ के. पी. रघुवंशी, विजय कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे.
 विद्यमान आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांना महासंचालकपदी बढती दिली जाणार आहे.  अरूप पटनाईक यांची प्रतिनियुक्ती मंजूर झाल्याने महासंचालकपदाचे आणखी एक पद रिक्त होणार आहे. त्यामुळे अहमद जावेद यांची नियुक्ती झाली तर महिन्याभरातच दुसरा आयुक्त नियुक्त करावा लागणार आहे. सप्टेंबरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सप्टेंबरात आणखी काही फेरबदल अपेक्षित आहेत.