मुंबई : पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिमसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगाव या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेले रब्बीचे पीक हातातून जाण्याची भीती आहे.

वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार सोमवारपासून अवकाळी आणि गारपिटीने पश्चिम विदर्भाला झोडपून काढले. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरासह नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा तालुक्यांतील काही भागांत गारपीट झाली तर, बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव या तालुक्यांना तडाखा बसला. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सोमवारी सायंकाळनंतर विजेच्या गडगडाटासह जोरदार गारपीट झाली. वीज पडल्याच्या वेगवेगळ्या घटनांत पल्लवी विशाल दाभाडे (वय २१) आणि शिवाजी गणपत कड (वय ३८) यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्येही अवकाळी पाऊस नुकसान करणारा ठरला. कन्नड तालुक्यात वीज पडून बैल मृत झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Interim Budget 2024 : वित्तीय तूट एक लाख कोटींवर, कर्जाचा बोजा आठ लाख कोटी

अवकाळीचे संकट कायम

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची एक चक्रिय स्थिती हरियाणावर सक्रिय आहे. बागंलादेशाच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून राज्यस्थानपर्यंत द्रोणिका रेषा निर्माण झाली आहे, आणखी एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत तयार झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने येणारे मोठे बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. या हवामान विषयक स्थितीमुळे एक मार्चनंतर कोकण वगळता राज्याच्या बहुतेक भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना एक ते तीन मार्च या काळात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही अवकाळीचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.

रब्बीवर संकट

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या रब्बी पिकांना बसला आहे. काढणीला आलेली पिके पावसामुळे आडवी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका, बाजरी, सोयाबीन, कांदा या पिकांच्या उत्पादनालाही पावसाची झळ बसणार आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेडनेटचे नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादकही संकटात सापडले आहेत. विदर्भात रब्बी पिकांसह संत्रा बागांचेही मोठे नुकसान झाले.