लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शनकाची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले. आरोपीने सायबर फसवणूक करणाऱ्याला टोळीला बँक खाते उघडून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्याला आरोपींनी ५० हजार रुपये दिल्याचे समजते.

हिमांशू नायक असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणातील तक्रारदार प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक असून ते समाज माध्यमांवर सक्रिय असतात. जानेवारी महिन्यात त्यांना एका समाज माध्यमांवर शेअर्स व्यवहारासंदर्भात जाहिरात दिसली होती. त्यामधील लिंकवर तक्रारदाराने क्लिक केले असता त्यांना एका व्हॉटस् अप समुहात सामील करण्यात आले. या समुहात शेअर्स व्यवहारासंदर्भात विविध माहिती अपलोड करून गुंतवणुकीबाबत माहिती देण्यात येत होती. या माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा-मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक

वॉट्सअप समुहातील ॲडमिन असलेल्या एका महिलेने एका खाजगी कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसेच त्यातून चांगला परतावा मिळेल असे आश्वासन दिले. त्यांनी गुंतवणुकीसाठी एक आभासी खाते उघडले होते. या खात्याच्या माध्यमातून त्यांनी शेअर्समध्ये सुमारे साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा मिळत असल्याचे दिसले. मात्र ही रक्कम त्यांना काढता येत नव्हती. ती रक्कम काढण्यासाठी त्यांना विविध कर म्हणून पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी ही रक्कम न भरता त्याची सायबर पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातून हिमांशू नायकला चौकशीसाठी ताब्यात घेतले.