मुंबई, दावोस : दावोस आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी व्यक्त केला. या परिषदेला रविवारी सुरूवात झाली़  

दावोस आर्थिक परिषदेतील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी सुभाष देसाई यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी विविध कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आले.

पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याच्या देशाच्या प्रयत्नात महाराष्ट्र अग्रणी असून, राज्याने एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातून राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योगपती व तज्ज्ञ मंडळी दावोस, स्वित्र्झलड येथे एकत्र आली आहेत. यातील अनेक गुंतवणूकदारांनी राज्याच्या दालनाला भेट दिली. जपानच्या सनटोरी कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या शिष्टमंडाने चर्चा केली. रसायन क्षेत्रातील बहुराष्ट्रीय यूपीएल या कंपनीने रायगड जिल्ह्यात २५० एकर भूखंडावर गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून, त्यासंबधी चर्चा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लोबल प्लास्टिक अ‍ॅक्शन पार्टनरशिप यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.