करोना संकटकाळातील टाळेबंदीमुळे राज्याच्या महसुली उत्पन्नाचा आलेख घसरल्याने आता राज्याचा खर्च भागवण्यासाठी पुन्हा एकदा कर्जरोख्यांच्या विक्रीतून निधी उभारण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

मागील महिन्यातील ३५०० कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांच्या विक्रीनंतर आणखी तीन हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक उलाढालीचे चक्र थांबले. त्यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग असलेल्या वस्तू व सेवाकराचा महसूल कमी झाला. पहिल्या सहामाहीत वस्तू व सेवा कराचे उत्पन्न मागच्या वर्षीच्या तुलनेत २५ हजार कोटींनी कमी झाला. त्यामुळे कर्जरोख्यांच्या विक्रीचा मार्ग निधी उभारण्यासाठी चोखाळण्यात येत आहे.

सप्टेंबरमध्ये राज्य सरकारने अल्प व दीर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांच्या विक्रीतून ३५०० कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची अधिसूचना काढली होती. आता पुन्हा एकदा ३ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येकी एक हजार कोटीचे तीन कर्जरोखे अनुक्रमे ७, ८ व १० वर्षे मुदतीसाठी काढण्यात येत आहेत.