|| प्रसाद रावकर

प्रलंबित थकबाकी १४४ कोटी

मुंबई : करोनाकाळात पालिका अधिकारी, कर्मचारी, तसेच संशयित रुग्णांसाठी खोल्या उपलब्ध करणाऱ्या हॉटेल मालकांना भाड्याच्या रकमेसोबतच सवलतीची दक्षिणा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या हॉटेल मालकांनी यापूर्वी मालमत्ता करापोटी १४४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकविल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या हॉटेल मालकांना २२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या सवलतीची दक्षिणा द्यायची की नाही याबाबत पालिकेत मतभिन्नता आहे.

टाळेबंदीकाळात वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करता यावी या दृष्टीने पालिकेने १८६ हॉटेल ताब्यात घेतली होती. तर काही हॉटेलमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली.

पंचतारांकित हॉटेलना त्यांच्या दर्जानुसार प्रतिदिन प्रतिखोली २००० ते ५०००  रुपये दर पालिके कडून देण्यात येत होते. हॉटेल मालकांच्या मागणीवरून त्यात वाढ करण्यात आली. त्यानुसार ३,५०० ते १,५०० हे दर निश्चित करण्यात आले. पालिकेचे दर तुलनेत कमी असले तरी टाळेबंदीत हॉटेलची देखभाल, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविणे मालकांना शक्य झाले. आणीबाणीच्या काळात मालकांनी मदत केल्यामुळे पालिकेने त्यांना तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १८६ हॉटेलचा मिळून २२ कोटी ६७ लाख रुपये मालमत्ता कर माफ होणार आहे. करामध्ये सवलत देण्याची बाब राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे हॉटेल मालकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या खात्यातून करनिर्धारण व संकलन विभागाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या सवलतीपोटी पालिकेला २२ कोटी ६७ लाख रुपयांवर पाणी सोडावे लागेल. दुसरे म्हणजे यापैकी बहुसंख्य हॉटेल मालकांनी यापूर्वी पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. थकबाकीची ही रक्कम तब्बल १४४ कोटी ६२ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

करोनाकाळात हॉटेलमधील खोल्या वापरण्यास दिल्याबद्दल पालिकेकडून संबंधित मालकांना शुल्क देण्यात आले आहे. आता त्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. मुळात यापैकी बहुसंख्य हॉटेलकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांना ही सवलत देऊ नये.

– रवी राजा, विरोधी पक्षनेते