मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मालाड येथील वलनाई गाव येथे उभारण्यात आलेल्या २१७० खाटांचे करोना रुग्णालय पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

एमएमआरडीएने दोन महिन्यांत हे रुग्णालय बांधले आहे. या रुग्णालयातील ७० टक्के खाटा या वैद्यकीय प्राणवायूच्या सुविधांनी सज्ज आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने ८९ कोटी ६४ लाख रुपयांचा खर्च केला आहे. त्यातील ५७ कोटी रुपये रुग्णालयाच्या बांधकामावर, तर ३३ कोटी रुपये हे वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्यासाठी खर्च झाला आहे.

अद्यावत सुविधांसह हे रुग्णालय उभारण्यात आले असून त्यामध्ये लहान मुलांसाठीही सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात १९० खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू), १५३६ ऑक्सिजन सुविधायुक्त  खाटा, २० खाटांचे डायलिसिस युनिट, ४० खाटांचे ट्रायजेज आणि ३८४ खाटांचा विलगीकरण कक्ष आहे. त्याचबरोबर मुलांसाठी विशेष अतिदक्षता विभाग आहे. तसेच हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली असून पोर्टेबल एक्स-रे, सीटी स्कॅनर, ईसीजी मशीन या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाला द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा अखंड पुरवठा सुरू राहावा याकरिता द्रवरूप प्राणवायूच्या चार टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एमएमआरडीएने २४० सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवले आहेत.