शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना, ज्यांनी त्यांना वेदना दिल्या, त्यांना बाळासाहेबांचे नाव का घेत नाही, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला.
राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईमधील कार्यक्रमात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या भाजपच्या ‘सिंहगर्जना’ मेळाव्यातील मोदींच्या भाषणाचा संदर्भ घेत ‘महाराष्ट्रात, मुंबईत येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायला विसरता. इतक्या वर्षांची युती विसरता,’ असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. संयुक्त महाराष्ट्राच्या जखमांवरील खपल्या काढू नका, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, बाळासाहेब जिवंत असताना, ज्यांनी त्यांना वेदना दिल्या, त्यांना बाळासाहेबांचे नाव का घेत नाही, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? सध्या देशामध्ये मोदींच्या बाजूने वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रातही तसेच वातावरण आहे. त्यामुळे राज ठाकरे स्वतःसाठी राजकीय स्थान निर्माण करण्यासाठीच अशी विधाने करीत आहेत, असे फडणवीस म्हणाले.