प्रशासनाकडून शुभांगी सावंत यांची शिफारस;सत्ताधारी शिवसेनेच्या काही नेत्यांचा विरोध

मुंबई : पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिका चिटणीस पदावरील वादात आता प्रशासनाने ठाम भूमिका घेतली असून या पदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या शुभांगी सावंत यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतर विद्यमान चिटणीसांनी प्रशासनाचा हा प्रस्ताव येत्या महासभेच्या कामकाजात समाविष्ट केला आहे. मात्र, सावंत यांच्या नावाला शिवसेनेतील काही नेत्यांचा विरोध असल्यामुळे या विषयाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.

महापालिका चिटणीस या एकल पदासाठी नेहमीच सेवाज्येष्ठतेचा वाद आडवा येतो. पालिकेचे चिटणीस पद १ जून २०२० पासून रिक्त असून या पदासाठी शुभांगी सावंत व संगीता शर्मा या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ होती. सावंत या वरिष्ठ असल्यामुळे त्यांना हे पद मिळणे अपेक्षित आहे. मात्र शिवसेनेने सावंत यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या शर्मा यांना या पदावर आणल्यानंतर हा वाद पेटला. त्यातच सावंत यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला होता. या वादात न्यायालयाने प्रशासनाला कानपिचक्या दिल्यानंतर प्रशासनाने सावंत यांचा अर्ज पदोन्नती समितीकडे पाठवला होता. समितीने सावंत यांना पात्र ठरवल्यानंतर त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये चिटणीस विभागाकडे पाठवला. मात्र आताच्या चिटणीसांनी हा प्रस्ताव मिळाला नसल्याचे सांगून तो पटलावर मांडलाच नाही. अखेरीस न्यायालयाने खडसावल्यानंतर आता हा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून महासभेच्या पटलावर मांडला असून या मंगळवारच्या महासभेत त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोपनीय अहवाल गहाळ झाल्याचे कारण

सावंत यांच्या नियुक्तीसाठी प्रशासनही अनुकूल असून प्रशासनाने पदोन्नतीच्या कार्यपद्धतीनुसार सावंत यांचे पाच वर्षांचे गोपनीय अहवाल विद्यमान चिटणीसांकडे मागितले होते. मात्र चिटणीसांनी अहवाल देण्यास विलंब केला व नंतर काही अहवाल गहाळ झाल्याचे उत्तर आताच्या चिटणीसांनी दिले, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. प्रशासनाने अहवालांची छाननी केली असता सावंत यांना उत्तम शेरा असल्याचे आढळून आले. त्यामुळे पदोन्नती समितीने त्यांना पात्र ठरवले आहे. मात्र हे पद मिळू नये म्हणून त्यांच्या नियुक्तीचा प्रस्तावच चिटणीसांनी कामकाजात समाविष्ट केला नाही. आता मात्र हा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आल्यामुळे येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर होतो की नाही याबाबत उत्सुकता आहे.

राजकीय रंग

चिटणीस पदाच्या नियुक्तीला राजकीय रंग आला असून याबाबत सेना विरुद्ध भाजप असा वाद आहे. त्याचबरोबर मराठी विरुद्ध अमराठी असाही वाद रंगणार आहे. सावंत यांच्या नावाला सेनेने विरोध केल्यास मराठीच्या मुद्दय़ावरून भाजप शिवसेनेची कोंडी करणार हे उघड आहे. या वादात कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष काय भूमिका घेतात हे देखील महासभेत स्पष्ट होणार आहे.