एखादा प्रकल्प उभारण्यासाठी वृक्षतोड करायची झाल्यास, तिला विरोध करणाऱ्यांचा आवाज मोठा असतो. मात्र, शिवडी-न्हावाशेवा ‘मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड’ (एमटीएचएल) प्रकल्पासाठी  १००४ झाडे तोडण्यासंदर्भातील जनसुनावणीपूर्वी ईमेलद्वारे मागवण्यात आलेल्या  सूचनांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांप्रमाणेच वृक्षतोड आक्षेप व निराकरण प्रक्रियेमुळे होणारा विलंब टाळावा, अशी मागणी करणाऱ्या प्रकल्प समर्थकांचेही प्रमाण लक्षणीय आहे.

‘एमटीएचएल’च्या शिवडी येथील बांधकामासाठी ४५४ झाडे कापावी लागणार आहेत, तर ५५० झाडांचे पुनरेपण करावे लागणार आहे. या संदर्भातील जनसुनावणी गुरुवारी वीर जिजामाता उद्यानात उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात घेण्यात आली. या प्रस्तावावर महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांकडे १३० विरोधाचे ई-मेल आले. तर वृक्ष तोडणी, आक्षेप आणि निराकरण या प्रक्रियेदरम्यान प्रकल्पास विलंब होतो, त्यामुळे प्रकल्प रखडतो, सबब हा विलंब टाळावा अशा आशयाचे प्रकल्पास पाठिंबा दर्शविणारे ८९ ई-मेलदेखील प्राप्त झाल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. अशा प्रकारे पाठिंबा दर्शविणारे ई-मेल प्रथमच आल्याचे त्यांनी नमूद केले.

नागरिकांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत विविध प्रकल्पांसाठी केले जाणारे वृक्षांचे पुनरेपण यशस्वी होत नसल्याचे चित्र आहे, असे सांगत क्षिप्रा जैन यांनी वृक्षतोडीवर व पुनरेपणावर आक्षेप नोंदविला. शिवडी कोळीवाडय़ातील कार्यकर्ते रूपेश ढेरंगे यांनी गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोडीविरोधात सर्वच यंत्रणांकडे विरोध दर्शविला असून त्यांच्या शिवडी येथील जय मल्हार सेवा संस्था या संस्थेमार्फत उद्यान अधीक्षकांकडे आक्षेप नोंदवला आहे. झाडे कापली तर स्थानिकांसोबत शिवडी रेल्वे स्थानकात रेल रोको आणि पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बांधकामामध्ये तांत्रिकदृष्टय़ा बदल करून जास्तीत जास्त वृक्ष वाचवावे, अशी अपेक्षा ढेरंगे यांनी व्यक्त केली.

‘हे सर्व आक्षेप एमएमआरडीएला पाठवले जातील. गरज असेल तर सुधारित प्रस्ताव मागवला जाईल. त्यानंतर अंतिम प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवला जाईल,’ असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

वाकोला-सीएसटी रोडवर आक्षेप

वाकोला-सीएसटी रोडवरील उन्नत मार्गासाठी ६३१ झाडे हटवण्याच्या प्रस्तावावर सुमारे १८० आक्षेपाचे ई-मेल आले आहेत. या उन्नत मार्गासाठी २९९ झाडे कापणे आणि ३३२ झाडांचे पुनरेपण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर आक्षेप नोंदवताना राज भाटिया यांनी भविष्यात सुरू होणारी मेट्रो सेवा, बेस्ट बसेसचे भाडे कमी केल्यामुळे वाहनांची गर्दी कमी होणे तसेच बीकेसी कनेक्टर पूर्ण झाल्यानंतर कमी होणारी वाहतूक कोंडी या सर्व बाबी असताना उन्नत मार्गाची गरजच नसल्याचे नोंदवत वृक्षतोडणी आणि पुनरेपणाला विरोध केला आहे.

झाडांचा अडथळा अचानक?

एमटीएचएल प्रकल्पासाठी किती झाडे तोडावी लागणार, याची माहिती पर्यावरण कार्यकर्ते झोरु बथेना यांनी काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएकडून माहिती अधिकाराखाली मागितली होती. त्याला उत्तर देताना प्राधिकरणाने एकही झाड तोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता अचानक १००४ झाडे हटवण्याचे कारण काय, असा आक्षेप बथेना यांनी नोंदवला.